आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलाहाबादच्या दुर्घटनेनंतर रेल्वे वाहतुकीवर झाला परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- कुंभमेळ्यानिमित्त अलाहाबादमध्ये प्रचंड गर्दी उसळली. चेंगराचेंगरी होवून 35 भाविकांचा बळी गेला. आता परतीचा प्रवास करणार्‍यांची संख्या वाढली असून रेल्वेसेवेचे नियोजन कोलमडले आहे. परिणामी उत्तर भारतातून महाराष्ट्रातील भुसावळ विभागात येणार्‍या 20 गाड्या दोन दिवसांपासून विलंबाने धावत आहेत.
उत्तर भारताकडून मुंबईकडे जाणार्‍या बहुतांश रेल्वे गाड्या भुसावळ आणि सुरतमार्गे जातात. सध्या या गाड्या प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरल्या आहेत. त्यातही कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे महाराष्ट्राकडे परतीचा प्रवास करणार्‍या भाविकांची संख्या जास्त आहे. यामुळे अनेक गाड्या नियोजित वेळापत्रकापेक्षा एक ते आठ-नऊ तासांपर्यंत उशिराने धावत आहेत. भुसावळ विभागातून इतरत्र प्रवास करणारे यामुळे चांगलेच त्रस्त झाले आहेत. विशेषत: रात्री प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांना रात्रभर जागूनही सकाळी स्थानकावर येणार्‍या गाडीत जागा पकडण्यासाठी कसरत करावी लागते. आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरी करून अनेक जण प्रवास करत असले तरी या स्थितीवर नियंत्रण मिळवणे रेल्वे प्रशासनासाठी तारेवरील कसरत ठरले आहे.
दरम्यान, अलाहाबाद येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही गाड्या अलाहाबाद जवळील छियोकी स्थानकावरून सोडण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपासून महाराष्ट्राकडे येणार्‍या गाड्या याच स्थानकावरून येत आहेत. मात्र, उत्तर भारतातून येणार्‍या गाड्या उशिराने येत असल्याने मुंबई आणि पुण्याहून सुटणार्‍या गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. गीतांजली, गोवा एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक-काशी एक्स्प्रेस यासारख्या काही वेळेवर धावत असल्याने प्रवाशांना मात्र किचिंत दिलासा मिळाला आहे.

ऐनवेळी तिकीट रद्द केले
अलाहाबाद येथे कुंभमेळ्यासाठी जाणार होतो. मात्र, उत्तर भारतात जाणार्‍या गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवासाचे नियोजन कोलमडले. यामुळे कामयानी एक्स्प्रेसचे काढलेले आरक्षित तिकीट रद्द करून खासगी वाहनाने कुंभमेळ्याला जात आहे. इतरही काही भाविकांनी रेल्वेचे तिकीट रद्द केले आहे. केवळ रेल्वेच्या भरवशावर अवलंबून न राहता अन्य पर्यायांचा शोध घेतला. यामुळेच आम्हाला कुंभमेळ्यातील आनंद आणि पवित्र गंगास्नानाचा लाभ घेता आला.
-कैलास देवकुटे, त्र्यंबकेश्वर, जि नाशिक

गाड्या वेळ भरून काढतील
अलाहाबादमधील दुर्घटनेमुळे भुसावळ विभागात येणार्‍या गाड्या उशिराने धावत आहेत. यापैकी काही गाड्या वेळ भरून काढण्याचा प्रयत्न करतात. प्रामुख्याने भुसावळ विभागात येणार्‍या गाड्या ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा कोणत्याही स्थानकावर जास्त काळ थांबवत नाही. यामुळे गैरसोय दूर होण्यास मदत होते. दोन दिवसात दोन्ही बाजूकडील गाड्या नियमित वेळेवर चालतील.
-एन.जी.बोरीकर, प्रबंधक, वरिष्ठ वाणिज्य विभाग,भुसावळ

भुसावळातून 18 गाड्या
उत्तर भारतातून भुसावळ विभागात येणार्‍या 18 गाड्या आहेत. यापैकी उशिराने धावणार्‍या गाड्या अशा : गोदान एक्स्प्रेस 9 तास, काशी तीन तास, ताप्तीगंगा एक तास 10 मिनिटे, भागलपूर 2.30, रत्नागिरी तीन तास, कामायनी चार तास, महानगरी अडीच तास, राजेंद्रनगर 45 मिनिटे उशिराने धावत आहे. रात्रीच्या प्रवासासाठी नियोजित गाड्या सकाळी स्थानकावर आल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. आसनसोल, वाराणसी, गुवाहाटी, गोरखपूर, जनता, तुलशी, पवन, वाराणसी-पुणे, पटना-पुणे, ताप्तीगंगा आणि पटना-वास्को या गाड्यांना उशीर झाला.

वेळेचा अपव्यय होतो
पाच वर्षांपासून जळगाव येथे दररोज अप-डाउन करतो. कामाची बदलती वेळ असल्याने रेल्वेने ये-जा सोयीची होते. मात्र, कुंभमेळ्यात अलाहाबाद येथे झालेल्या दुर्घटनेमुळे रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक बिघडले आहे. याचा फटका आमच्यासारख्या प्रवाशांना बसला आहे. गाड्या नियोजित वेळापत्रकानुसार चालल्या तर काम संपल्यावर तास-दीड तासात घरी पोहचता येते. आता उशिराने धावणार्‍या गाड्यांमुळे गैरसोय होते.
-पुरुषोत्तम चौधरी, प्रवासी, भुसावळ