आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँलर्जीचा धोका: जळगावात घराघरांमध्ये लष्करी अळ्यांचा उच्छाद!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पावसाचे वातावरण व आर्द्ररता वाढल्यामुळे गल्लोगल्ली काळ्या रंगाच्या केसाळ अळ्यांचे (लष्करी) प्रमाण प्रचंड वाढले आहे. प्रतिबंध होत नसल्याने या अळ्या आता घरांकडे वळू लागल्या आहेत, या अळय़ांमुळे मुलांना अँलर्जीचा धोका वाढला आहे. या अळ्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी ती आमची नव्हे, तर कृषी विभागाची जबाबदारी असल्याचे सांगत टोलवाटोलवी सुरू केली आहे.

काही दिवसांपासून खोटेनगर, हरिविठ्ठलनगर परिसरातील र्शीधरनगरसह शहरात सर्वत्र या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळ्यात वाढणार्‍या या केसाळ अळ्या झाडांची पाने खात असतात; परंतु काही दिवसांपासून घरासमोरील झाडांवर असलेल्या या लष्करी अळ्यांनी आता घरात प्रवेश केला आहे.

पावसाळी वातावरण व आर्द्ररता, त्यात पोषक वातावरण मिळाल्याने उत्पत्ती वाढल्याने अळ्यांचे प्रमाणही वाढले आहे. घरातील लहान मुले या अळय़ांच्या संपर्कात आल्यामुळे अँलर्जीचा त्रासही वाढला आहे.

पालिकेने जबाबदारी झटकली
महापालिकेच्या मलेरिया विभागातर्फे शहरात फवारणीचे काम केले जाते. मात्र, आमची जबाबदारी केवळ डासांना प्रतिबंध करण्याची आहे. अळ्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी कृषी विभागाची असल्याचे मलेरिया विभागाचे प्रमुख एस.जे.पांडे यांनी सांगितले. एक प्रकारे शहरातील साफसफाईसह मलेरिया प्रतिबंध फवारणीची जबाबदारी असलेले पालिकेचे अधिकारी लष्करी अळींशी आमचा संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रकार करीत आहेत. मग शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

अळ्या आहेत पक्ष्यांचे खाद्य
काळ्या रंगाच्या केसाळ अळ्या पक्ष्यांचे खाद्य असते. झाडांवरील पानांवर जीवनचरित्र चालवणार्‍या या लष्करी अळ्यांना पोषक वातावरण मिळताच त्यांची संख्याही वाढते. ती एकाच ठिकाणी जास्त असल्याने त्यांची संख्या प्रचंड आहे. बर्‍याचदा पूजेसाठी आणलेल्या फुलांमध्येही या अळ्या घरात दाखल होत असतात. याचा फारसा त्रास नसला तरी लहान मुलांना अँलर्जी होऊ शकते.
-प्रा. आर.टी.महाजन, विभागप्रमुख, जीवशास्त्र विभाग, मू.जे.

सोमवारी पाहणी करू
खोटेनगरसह श्रीधरनगरसह शहरात या अळ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे समजले आहे. त्यांच्या प्रतिबंधासाठी काय करता येईल, याबाबत सोमवारी पाहणी करून कर्मचार्‍यांना आदेश देतो.
-डॉ. विकास पाटील, आरोग्य अधिकारी