अमळनेर : नाेकरी लावण्याचे अामिष दाखवून अमळनेरच्या युवकाची २४ लाखांत फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून नाशिकच्या एका पुरुषासह महिलेला पाेलिसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले अाहे.
अमळनेर पाेलिस ठाण्यात यासंदर्भात अाशुताेष विलास देसले यांनी फिर्याद दिली अाहे. यात म्हटले अाहे की, नाशिक येथे कर्मवीर बाबुराव ठाकरे इंजिनियरिंग कॉलेजला १० ऑगस्ट २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत बी.ई. मॅकेनिकसाठी शिक्षण घेत हाेताे. त्यात तीन वेळा नापास झालाे. त्यानंतर युगंधर पगार (शिक्षक कॉलनी, मखलाबाद एरिया, नाशिक) याने तुला नोकरीला लावून देतो, असे आश्वासन देऊन आईकडून २२ ते २४ लाख रुपये घेऊन फसवणूक केली.
श्वेता पांढरे (रा.नाशिक) हिने इलेक्ट्राॅनिक्स माध्यमांना माहिती देऊन बदनामी करण्याची धमकी दिली. नाशिक अमळनेर येथील राहत्या घरी वारंवार धमकावले. अमळनेर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक देविदास बिऱ्हाडे, काॅन्स्टेबल सुनील पाटील, विशाल चव्हाण, रेखा ईशी यांनी नाशिक येथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. तपास देविदास बिऱ्हाडे हे करीत आहेत.
भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा शेंदुर्णीचे माजी सरपंच गोविंद अग्रवाल यांनी नोकरीचे आमिष दाखवून चार लाख रुपयांत फसवणूक केल्याची तक्रार मध्यस्थ असलेल्या गफ्फुर शोएब तडवी यांनी पहूर पोलिस ठाण्यात दिली आहे. तर सुशिक्षित बेरोजगार मनोहर राजेंद्र पाटील यांनी मध्यस्थ असलेल्या तडवी यांचेविरुद्ध यापूर्वीच तक्रार दिलेली असल्याची माहिती पाेलिस सूत्रांनी दिली.
इस्लामबी शोएब तडवी या शेंदुर्णी ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. त्या गोविंद अग्रवाल यांचेसोबत भाजपप्रणीत आघाडीतर्फे निवडून आलेल्या आहेत. इस्लामबी तडवी यांचा मुलगा गफ्फुर हा भाजपचाच कार्यकर्ता असल्याने गोविंद अग्रवाल यांचेशी जवळचे संबंध होते. सरस्वती विद्यामंदिर या शाळेशी माझी जवळीक असून कुणाला नोकरी लावायची असेल तर सांग असे अग्रवाल यांनी सांगितले.
पाटील यांनी २०१५ साली प्रथम चार लाख रुपये दिले उर्वरित रक्कम नोकरी लागल्यानंतर द्यावयाचे ठरले. मात्र, त्यानंतर अग्रवाल हे टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आले. पाटील यांना नोकरी देऊ शकत नसाल तर त्यांचे पैसे परत करा, असे म्हणालो. त्या वेळी अग्रवाल यांनी मला माझ्याच खात्याचे धनादेश द्यावयास सांगितले. त्यानुसार मी माझ्या खात्याचे धनादेश दिले अग्रवाल यांना माझ्या खात्यात पैसे भरा, अशा विनंत्या केल्या.
अग्रवाल यांना पैसे द्यावयाचे नाही, असा उद्देश लक्षात आल्याने फसवणूक झाल्याबाबत गुरुवारी पहूर पोलिसांत तक्रार दिल्याचे गफ्फुर याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.
बदनामीचा प्रयत्न
- सरस्वती विद्या मंदिर किंवा मनाेहर पाटील यांचेशी माझा कुठलाही संबंध नाही. मी मनाेहर पाटील यांना कधीही भेटलो नाही, त्यामुळे त्यांचेकडून पैसे घेण्याचा प्रश्नच नाही. गफ्फुर याने पाटील यास स्वत:च्या खात्याचा धनादेश दिलेला असून तो बाउन्स झाला आहे. ४० वर्षांपासून सार्वजनिक जीवनात काम करीत असून काही विरोधक गफ्फुर याला हाताशी धरून माझी बदनामी करीत आहेत.
गोविंद अग्रवाल, शेंदुर्णी