आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amalner Sexual Viedo Viwers Come On Laws Control

अमळनेरमधील तरुणीची अश्लील चित्रफीत पाहणारे येणार कायद्याच्या कचाट्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अमळनेरमधील एका तरुणीची अश्लील चित्रफीत तयार करून ती सर्वत्र वितरित होत असल्याची बाब राष्ट्रवादी युवती काँग्रेसने दाखवलेल्या हिमतीमुळे बुधवारी उघड झाली. याप्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने तपासाला वेग दिला आहे. या चित्रफितीचे वितरण, प्रचार-प्रसार रोखणे हे पोलिस यंत्रणेपुढील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. नव्या आयटी कायद्यानुसार, अश्लील चित्रफीत तयार करणार्‍याइतकेच तिची मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉपमधून देवाण-घेवाण करणारेही आरोपी ठरू शकतात. त्यामुळे या चित्रफितीची ‘सेंडासेंडी’ करणारेही कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतात.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसने ही बाब उघड केल्यानंतर आता पोलिसांना संबंधित पीडित तरुणी पुढे न येताही स्वत: गुन्हा नोंदवून तपास करणे भाग आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सायबर क्राइमचा गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. असा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाच्या पहिल्या टप्प्यात सायबर कॅफे, आंबटशौकीन
मोबाइलधारक यांचा छडा लावून त्यांच्या संगणक आणि मोबाइलमधील चित्रफीत डिलीट करण्याची मोहीम उभारली जाण्याची शक्यता आहे. पोलिस ज्यांच्याकडे या चित्रफिती स्टोअर आहेत, अशांचे मोबाइल्स किंवा मेमरी कार्डही जप्त करू शकतात. महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या गुन्ह्यात आतापर्यंत गृहखात्याच्या निर्देशानुसार, याच पद्धतीने तपास झाला आहे. चित्रफीत तयार करून ती एमएमएस, ब्ल्यूटूथ, वाय-फाय अथवा व्हॉट्सअप सारख्या प्रोग्राम्सच्या माध्यमातून ती पुढे कुठे-कुठे वितरित केली गेली, ही साखळी पोलिस शोधून काढतील.

संशयित मोबाइलमधील मेमरी कार्ड तपासण्यासाठी मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले जाऊ शकते. तिथे कार्डमधून डिलीट केलेल्या क्लिपही दिसू शकतील, असे नवे सॉफ्टवेअरही तयार करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत हैदराबाद प्रयोगशाळेतही तपासणीची सोय आहे. पोलिसांनी सीसीटीएनएस अर्थात क्राइम क्रिमिनल इन्फॉर्मेशन ट्रॅकिंग सिस्टिम सक्षमपणे वापरल्यास जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांना निश्चितच अटकाव केला जाऊ शकतो.

पोलिसांनी काय गुन्हा दाखल करावा? : सायबरतज्ज्ञ तसेच पोलिसांच्या सायबर सेलमधील अधिकार्‍यांच्या मते तरुणीची संगनमताने, तिच्या संमतीने अथवा जबरदस्तीने अश्लील चित्रफीत तयार करणे हा सायबर गुन्हा आहे. अशा चित्रफितीचे वितरण, प्रचार-प्रसार हाही तितकाच गंभीर सायबर गुन्हा आहे. अशा प्रकरणात पारंपरिक बलात्काराच्या व कटाच्या गुन्ह्यासह सन 2000च्या सायबर कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल व्हायला हवा. त्यानुसार अमळनेरमधील गुन्ह्याबाबत भादंविच्या कलम 376, 294, 291(2) व 34 तसेच कलम 509 व 506(ब) आणि आयटी कायदा कलम 66, 66(अ), 66(ई), 67, 67(अ) या कलमान्वये गुन्हा दाखल केला.

काय असतो सायबर गुन्हा? : सायबर गुन्हा हा पारंपरिक गुन्ह्याप्रमाणेच असतो. फक्त हा गुन्हा घडवून आणताना त्यात इलेक्ट्रॉनिक साधने, मोबाइल, इंटरनेट यांचा वापर केला जातो. मोबाइल, इंटरनेट हॅकिंग करणे, इंटरनेट रिले चॅट क्राइम, क्रेडिट कार्ड फ्रॉड, सुफिंग, सायबर स्टॉकिंग, नायजेरियन फ्रॉड, सायबर डेफिमेशन असे सायबर गुन्ह्याचे अनेक प्रकार आहेत. महिलांच्या बाबतीत होणार्‍या गुन्ह्यांमध्ये ई-हॅरॅशमेंट, सायबर स्टॉकिंग, सायबर पोर्नग्राफी, डिफेमेशन, मॉफिंग आणि ई-सुफिंग असे प्रकार आहेत.

पालकांनी काय करावे? : एसएमएस, ई-मेलद्वारे अश्लील चित्रफीत फॉरवर्ड करणे हा दखलपात्र गंभीर गुन्हा आहे. माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये अटकेची त्यात तरतूद आहे. पालकांनो, केवळ हौसेखातर आपल्याही मुलांनी मित्र, अथवा परिचितांकडून ही चित्रफीत आपल्या मोबाइलमध्ये घेतलेली असू शकते. ती जर त्यांच्या मेमरी कार्डमध्ये सापडली तर तेही या सायबर गुन्ह्यात अडकू शकतात. त्यामुळे आपण त्याचे मोबाइल, मेमरी कार्ड जरूर तपासून पाहावे. तुम्हाला ते शक्य नसेल अथवा समजत नसेल तर एखाद्या परिचित मोबाइल जाणकाराकडून ते जरूर तपासून घ्यावे.

पोलिसांनी हे करायला हवे : अश्लील चित्रफीत ज्यांच्याकडे आहे त्यांची माहिती कळवणार्‍यास त्यांचे नाव गुप्त ठेवून बक्षीस जाहीर करावे. त्यामुळे चित्रफितीच्या प्रसाराची साखळी शोधून काढण्यास निश्चितच मदत होईल. गुन्ह्याच्या तपासाबरोबरच या चित्रफिती शक्य तेवढय़ा लवकर डिलीट करून नष्ट करणे आणि पुढील प्रचार-प्रसाराला अटकाव करणे यालाच पोलिसांनी प्राधान्य द्यायला हवे.

पाच वर्षे कैदेची शिक्षा : अश्लील चित्रफितीचे स्टोअरेज, ती स्वत: पाहणे व जाहीर प्रदर्शन तसेच शेअरिंग करणे हा गुन्हा आहे. तसे आढळल्यास कलम 66नुसार तीन वर्षे कैद व एक लाखांचा दंड तसेच इतर कलमानुसार जास्तीत-जास्त पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. ही चित्रफीत तयार करणार्‍यांना व त्यात सहभागी असलेल्यांना गुन्हा सिद्ध झाल्यास गेल्या महिन्यातच सुधारणा झालेल्या नव्या स्त्री अत्याचार विरोधी कायद्यानुसार पूर्वीच्या बलात्काराच्या सात वर्षांच्या कैदेपेक्षाही अधिक जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते.

कुठे संपर्क कराल? : सायबर क्राइममुळे झालेल्या छळासंदर्भात महिला आणि तरुणांना मदत मिळावी, यासाठी राज्य शासनाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या माध्यमाने ‘महिला व मुलांसाठीचा साहाय्यता कक्ष’ प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय येथे हा कक्ष कार्यरत आहे. या कार्यालयाशी 0257-2221719 या क्रमांकावर संपर्क साधावा. पोलिस अधीक्षक कार्यालयात एसएमएस करण्यासाठी 9823710157 टोल फ्री क्र. 100, 1091, 1098 किंवा 0257-2223333वर संपर्क साधता येतो. कुणी फेसबुक अथवा इंटरनेटने चारित्र्यहनन करत असेल, सायबर फसवणूक करीत असेल तर महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबईतील सायबर क्राइम सेलकडे 022-24691233 या दूरध्वनीर क्रमांकावर संपर्क साधता येईल किंवा cybercell.mumbai@mahapolice.gov.in या पत्त्यावर ई-मेल करता येईल.