आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यासाठी रुग्णवाहिकांचे ‘कवच’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - धकाधकीच्या जीवनात नाना व्याधी वाढल्या आहेत. वाढती लोकसंख्या व वाहनधारकांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. त्यास आळा बसावा म्हणून शहर परिसरात रुग्णसेवा देणा-या वाहिकांची संख्या वाढल्याचे सुखदायक चित्र आहे.

आकडेवारी पाहता सद्य:स्थितीत सुमारे 125 पेक्षाही अधिक रुग्णवाहिका अस्तित्वात आहेत. यामध्ये इएमसी अर्थात तातडीची वैद्यकीय सेवा देणा-या 16, जननी सुरक्षा योजनेच्या 41, धुळे मनपाची एक तर खासगी सेवा देणा-या सुमारे 25 रुग्णवाहिकांचा समावेश आहे. याशिवाय महामार्ग विस्तारीकरणाचा ठेका घेतलेल्या दोन खासगी कंपन्यांच्या प्रत्येकी एक अशा दोन रुग्णवाहिका आहेत. तसेच शिरपूर, दोंडाईचा, सोनगीर, पिंपळनेर, साक्री, शिंदखेडा शासकीय रुग्णालयातील सुमारे 20 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. शासनाच्या इएमसी योजनेतून सुरू करण्यात आलेल्या या रुग्णवाहिका 108 हा टोल फ्री क्रमांक डायल करताच घटनास्थळी धाव घेतात. या 16 रुग्णवाहिकांपैकी चार अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण आहेत. या रुग्णवाहिकांमध्ये एक चालक, डॉक्टर व कर्मचारी सतत कार्यरत असतात. संबंधित रुग्णाला शक्य तेवढ्या लवकर वैद्यकीय सेवा देत जवळच्या रुग्णालयात दाखल करणे, प्रवासात त्याच्या आरोग्याची काळजी घेणे एवढाच उद्देश नजरेसमोर ठेवून या रुग्णवाहिकांचे काम सुरू आहे. इएमसी योजनेतून सुरू झालेल्या या रुग्णवाहिकांवरील कर्मचा-यांवर कामाचा बोजा वाढू नये यासाठी प्रत्येकी आठ तासांची ड्यूटी ठरविण्यात आली आहे. त्यासाठी 64 डॉक्टरांची पदे ही भरण्यात आली आहे. या व्यतिरिक्त काही सेवाभावी संस्था, खासगी रुग्णालयांच्या रुग्णवाहिकाही सेवा देण्यात अग्रेसर आहेत.

बिघडलेल्या रुग्णवाहिकाही सेवेत
मोठ्या प्रयत्नांनी चालू होणा-या दे धक्का रुग्णवाहिका अजूनही काही ठिकाणी सेवेत असलेल्या पाहावयास मिळतात. मात्र त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत आहे. विशेष म्हणजे जुन्या झालेल्या या रुग्णवाहिका अजूनही शासनाने सेवेत ठेवल्या आहेत. जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग विभागाजवळ अशी रुग्णवाहिका नेहमी उभी दिसते. त्यामुळे कधी कधी रुग्णांना त्यांचा वाईट अनुभव आल्याने खासगी रुग्णवाहिकांना तत्काळ पाचारण करण्यात येते.
व्यवसायही होतोय जोरात..
एकीकडे मोफत सेवा देणा-या रुग्णवाहिकांचे जाळे विस्तारत असताना रुग्णांकडून पैसे घेऊन काम करणा-या काही खासगी रुग्णवाहिकाही आहेत. यातील काही जण तर परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी करतात. जिल्हा रुग्णालयात दुर्गम भागातून आलेल्या काही प्रवाशांना असे कटू अनुभव यापूर्वी आले आहेत. तर सेवाभावी संस्थेच्या नावाने रुग्णसेवेच्या नावाला बट्टा लावून धंंदा थाटणारे काही महाभागही आहेत.

येथे असते रुग्णवाहिका
महामार्गाला लागून असलेली शासकीय रुग्णालये व तत्सम बाबींचा विचार करून रुग्णवाहिकांना थांबा निश्चित झाला आहे. शिंदखेडा, दोंडाईचा, सोनगीर, शिरपूर, थाळनेर, साक्री, पिंपळनेर, नेर, मुकटी, आर्वी आदी ठिकाणी त्यांना थांबा देण्यात आला आहे. याशिवाय महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेणा-या कंपनीच्या लळिंग व कुसुंब्याजवळ या रुग्णवाहिका थांबत असल्याचे चित्र आहे.

थेट पुण्यात संपर्क
108 क्रमांक लावताच आरोग्य सेवा देणा-या बीव्हीजीच्या थेट पुणे कार्यालयात फोन लागतो. त्यानंतर नाव, पत्ता, जवळील लॅण्डमार्क, रुग्ण स्थितीची माहिती घेतली जाते. शिवाय कॉन्फरन्सने डॉक्टरांशी बोलणे करून दिल्यानंतर प्राथमिक उपचार, पथ्याबाबत सांगितले जाऊन रुग्णवाहिका दारापर्यंत पोहोचते. त्यामुळे रुग्णाला अथवा अपघातग्रस्त नागरिकांना वेळेत तातडीचे उपचार मिळतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांत रुग्ण दगावण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाल्याचे चांगले चित्र आहे.