आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फायनान्सच्या 100 रुपये वसुलीसाठी तरुणावर हल्ला; घरात घुसून ताेडफाेड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी ललित चाैधरी व राकेश नारखेडे. - Divya Marathi
जखमी ललित चाैधरी व राकेश नारखेडे.

जळगाव - फायनान्सने घेतलेल्या माेबाइलच्या शेवटच्या हप्त्यातील फक्त १०० रुपयांच्या वसुलीसाठी वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्याने १५ ते २० टाेळक्याच्या मदतीने तरुणावर थेट तलवारीने हल्ला केला. तसेच घरातील साहित्याची ताेडफाेड केली. यात चार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना साेमवारी रात्री ७.३० वाजता लीलापार्क परिसरात घडली.

 

दरम्यान, टवाळखाेरांनी लाठ्या-काठ्या, चॉपर, तलवारी मिरवत दहशत पसरवल्याने परिसरातील नागरिक प्रचंड घाबरले हाेते. याप्रकरणी नगरसेवकासह १३ जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

लीलापार्क येथील ललित चौधरी याने बजाज फायनान्स कंपनीकडून हप्त्याने मोबाइल घेतला होता. साेमवारी सकाळी ११ वाजता बजाज फायनान्सकडून प्रवीण चंद्रकांत वाघ हा माेबाईलचा हप्ता घेण्यासाठी अाला हाेता. त्यावेळी ललितने त्याला हप्त्यातील १६०० रूपये दिले तर १०० रूपये देणे बाकी हाेते. वाघ १०० रुपये मागण्यासाठी सायंकाळी वाजता १५ ते २० जणांसह ललितकडे अाला. त्यावेळी घरात ललितची अाई संगीता चाैधरी भूमिका चाैधरी या उपस्थित हाेत्या. वाघने ललितला शिवीगाळ दमदाटी करून घरातील कुलर, काॅट, विद्युत माेटार, खिडकीच्या काचाची ताेडफाेड केली. या वेळी टाेळक्याच्या हातात तलवार, चॉपर, दगड, लाकडी दांडे हाेते. त्यांनी सर्वप्रथम ललितवर हल्ला चढवला.

 

अचानक घडलेल्या घटनेमुळे लीलापार्कमधील इतर युवक रस्त्यावर अाले. त्यांनी टाेळक्याला विरोध केला; परंतु त्यांच्या हातात हत्यारे असल्यामुळे लीलापार्कमधील युवक गोंधळले. राकेश प्रकाश नारखेडे (वय २३, रा.जुने जळगाव) हा युवक टाेळक्याच्या हाती सापडला. त्यांनी राकेशला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या कपाळावर तलवारीने वार केला. 


या हल्ल्यामुळे राकेश जमिनीवर कोसळला. त्याला वाचवण्यासाठी अाकाश कोल्हे (वय २४, रा. जुने जळगाव) याने हल्लेखोरांना विराेध सुरू केला. त्यांनी अाकाशला देखील मारहाण केली. यात राकेश नारखेडे, अभिषेक किसन मराठे (रा.अयाेध्यानगर), ललित चाैधरी, अाकाश काेल्हे (रा.जुने जळगाव) हे गंभीर जखमी झाले. त्याच्यावर सिव्हिल खासगी रूग्णालयात उपचार सुरू अाहे. याप्रकरणी संगीता चाैधरी यांनी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली. यात नगरसेवक अश्विन साेनवणे, भैय्या भाेई, रवी भाेई, धनराज काेळी, अाबु भालेराव, माेनुसिंग बावरी, संदीप वारुळे, शुभम सपकाळे, किरण गव्हाणे, निखील बडगुजर, दर्शनसिंग टाक, प्रेमसिंग टाक, अविनाश नन्नवरे या १३ जणाविरूध्द भादंवि कलम ३०७ प्रमाणे एमअायडीसी पाेलिसात ठाण्यात रात्री १२ वाजता गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

 

दोघांना पकडण्यात यश 
वादसुरू असताना लीलापार्कमधील काही युवकांनी मोठ्या हिमतीने मारेकऱ्यांना विरोध सुरू केला. तर काही जणांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिली. टाेळके ज्या दिशेने पळून गेले त्याच दिशेने पोलिसांनी प्रवेश केला. त्यामुळे एकाला पोलिसांनी तर दुसऱ्याला लीलापार्कमधील युवकांनी पकडून दिले. या दोघांना रात्री एमअायडीसी पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची चाैकशी सुरू हाेती. 

 

तांबापुरात पाेलिसांनी घेतला हल्लेखाेरांचा शाेध 
मारहाणकरणारे हल्लेखाेर हे तांबापुरा परिसरातील राहणारे असल्याचा संशय लीलापार्क येथील युवकांनी व्यक्त केला हाेता. काही युवकांनी हल्लेखोरांची ओळखदेखील पटवली आहे. यातील दोन-तीन जणांना लीलापार्कमधील युवक ओळखत असून त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तांबापुरा भागात शोध देखील घेतला; परंतु ते सापडले नाही. 

बातम्या आणखी आहेत...