आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांच्या उपचाराने अजगराला मिळाले जीवदान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: गेल्या दोन महिन्यांपूर्वी भुसावळ-सावदा रस्त्यावरील एका शेतातील पडीक विहिरीत मरणासन्न अवस्थेत आढळून आलेला इंडियन रॉक पायथन प्रकारचा अजगर वनविभाग व सर्पमित्रांच्या अथक परिश्रमातून बचावला आहे.
भुसावळ येथील सर्पमित्र अ‍ॅलेक्स प्रेसडी व सतीश कांबळे यांनी दोन महिन्यांपूर्वी या अजगराला ताब्यात घेतले होते. भक्ष्याच्या शोधात पडक्या विहिरीत पडल्यामुळे अजगराच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्यातच काही नागरिकांनी दगडांचा मारा केल्याने हा अजगर जास्तच जखमी झाला होता.
दोन फ्रॅक्चर झाले रिकव्हर
या अजगराला जळगावात उपचारासाठी आणले होते. डॉ.मनीष बाविस्कर यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर अजगराचा एक्स-रे काढला. त्यात त्याच्या मणक्यांत दोन ठिकाणी फ्रॅक्चर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात न सोडता पूर्णपणे उपचार करण्यासाठी सर्पमित्र रवींद्र सोनवणे यांच्याकडे ठेवण्यात आले. तशी परवानगी वनविभागाकडून घेण्यात आली होती. तसेच शेपटीकडील भागात रक्तस्राव झाल्यामुळे तेथेही उपचार करण्यात आले. सुमारे दोन महिन्यापासून या अजगरावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, नुकतेच त्याचे प्लास्टर काढण्यात आले असून, मणक्यांतील फ्रॅक्चरही रिकव्हर झाले आहे. तसेच शेपटीच्या जखमेतून 20 ग्रॅम रक्त व घाण काढून ती बरी झाली आहे.
अंड्यांचे फोर्स फीडिंग
जखमी असल्यामुळे सुरुवातीला एक महिना अजगराने अन्न ग्रहण केले नव्हते. नंतर मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्याने त्याला इंजेक्शनच्या माध्यमातून अंडी देण्यात येत होती.
वन्यजीव सूचीत ‘ए’ ग्रेड
इंडियन रॉक पायथन प्रकारचा हा अजगर वन्यजीव सूचीत ‘ए’ ग्रेडमध्ये मोडत असल्यामुळे त्याला जवळ बाळगणे वा इजा पोहोचविणे हा गुन्हा मानला जातो. त्यामुळे सर्पमित्र तसेच वनविभागाच्या कर्मचाºयांनी या अजगराला उपचारासाठी यावल वनविभागातून जळगाव वनविभागात आणण्यासाठी तसेच दोन महिने बाळगण्याची रीतसर परवानगी घेतली होती. तथापि, लवकरच त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे.
लहानग्यांनी पक्ष्याला वाचविले
सम्राट ताठे व विराज नेरकर या शिवकॉलनी गट नं. 60 भागातील शाळकरी मुलांनी शुक्रवारी सायंकाळी झाडावरून खाली पडून जखमी झालेल्या एका जखमी कोकीळ (मादी) पक्ष्याला घरी नेऊन पाणी पाजले. नंतर भागातील पक्षिमित्र रवींद्र सोनवणेंकडे पक्ष्याला उपचारासाठी नेले. सोनवणे घरी नसताना त्यांचा मुलगा यश याने कोकिळेच्या मानेखालील जखमेवर प्रथमोपचार केले. पायात व पंखात अडकलेल्या धाग्यांमुळे कोकिळेची तडफड सुरू होती. यशने अलगद ते धागेही काढले आणि कोकिळेला पिंज-यात ठेवले. वेळीच उपचार मिळाल्याने ठीक झालेल्या या पक्ष्याला शनिवारी मुक्त करण्यात आले.