आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Analyses Defeating : Leader Base Party And Baseless Power

विश्लेषण - पराभव : ‘लीडर बेस’ पक्षाचा अन् ‘बेस लेस’ सत्तेचा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधकांच्या दुफळीवर ज्यांचं राज्य वसलेलं असतं त्यांच्या राज्याचं भवितव्य किती तकलादू असतं, याचं प्रत्यंतर जामनेरकरांनी आज आणून दिलं. भारतीय जनता पक्षाची जामनेर नगरपालिकेत असलेली सत्ता मतदारांनी उलथवून लावली. हा ‘धनशक्ती’चा विजय आहे, असा नेहमीचाच शेरा त्यावर मारला गेला असला तरी ही शक्ती एकतर्फी लागली होती आणि सत्ताधार्‍यांनी केवळ मत मांडत मते मागितली, हे कोणी मान्य करणार नाही. अर्थात, त्याची जाणीव असल्यामुळेच आमदार गिरीश महाजन यांनी विरोधकांच्या एकीवरच आपल्या पराभवाचे खापर फोडले. जामनेर शहराने विधानसभा निवडणुकीतही कधीच आपल्याला कौल दिलेला नाही, याची आठवणही त्यांनी करून दिली. त्यामुळे जामनेर पालिकेतला भाजपचा पराभव हा आपल्या कार्यशैलीचा पराभव नसून परिस्थितीने तो आपल्या पदरात टाकला आहे, हेच पटवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. स्पष्टच सांगायचं तर आमदार महाजन पराभवाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करायला आणि पूर्ण सत्य स्वीकारायला तयार नाहीत.

या निवडणुकीत भाजपचे विरोधक एकत्र आल्यामुळे विजय त्यांच्या पदरात पडू शकला, हे खरं आहे. मागच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार सुरेश जैन सर्मथक हे विभक्त होते. त्याचा फायदा आमदार गिरीश महाजन यांना झाला होता. म्हणजे त्या विजयाचं दान परिस्थितीने मागच्या निवडणुकीत आमदार महाजन आणि भाजपच्या पदरात टाकलं होतं, असं म्हणायला हरकत नाही.

पण म्हणून तेच विश्लेषण या वेळी करून चालणार नाही. गेल्या पाच वर्षात जामनेर नगरपालिकेने उत्तम कामगिरी केली आणि तरीही लोकांनी केवळ विरोधक एकत्र आले म्हणून त्यांना सत्ता दिली असे जर आमदार महाजन म्हणत असतील तर जामनेरातल्या मतदारांच्या विवेकावर त्यांचा विश्वास नाही, असाच त्याचा अर्थ होतो. ज्यावेळी राजकीय नेत्याचा मतदारांच्या विवेकावरचा विश्वास उडतो त्यावेळी त्या नेत्याने आत्मपरीक्षणाचा विवेक गमावलेला असतो, असाच आजवरचा अनुभव आहे. जामनेर नगरपालिकेच्या कामगिरीचा आलेख मांडताना शहरात विकासकामांच्या नावाने झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चावर कदाचित बोट ठेवले जाईल.

शहरात चार-पाच दिवसांनी का असेना पाणीपुरवठा होतो आहे यासाठीही सत्ताधारी स्वत:ची पाठ थोपटून घेतील; पण जामनेरकरांना नेमकं काय हवं होतं आणि ते आपण देऊ शकत असूनही का दिलं नाही, याचा विचार सत्ताधारी या नात्याने आमदार महाजन करणार आहेत की नाही? जामनेरकरांनी मोठय़ा विश्वासाने महाजनांच्या हातात नगरपालिका सोपवली होती. पण महाजनांनी काय केलं? तर नगरपालिकेतल्याच दोघा-तिघा कर्मचार्‍यांना ती आंदण देऊन टाकली. हे कर्मचारी लोकनियुक्त नगरसेवकांपेक्षा स्वत:ला मोठे आणि प्रभावी समजत होते, असं जामनेरमधील सामान्य मतदाराचंच नव्हे, अनेक नगरसेवकांचंही म्हणणं आहे.

साधनाताई नगराध्यक्ष असूनही हे म्हणणं कधी त्यांच्या कानापर्यंत पोहोचलं नाही का आणि पोहोचलं असेल तर ते त्यांनी आपल्या पतीच्या, अर्थात आमदार महाजनांच्या कानापर्यंत पोहोचवलं नव्हतं का? हे मग्रूर कर्मचारीच महाजनांच्या पराभवाला कारणीभूत आहेत असं नाही. किंबहुना, त्यापेक्षाही महत्त्वाची अनेक कारणं आहेत. कोणतीही निवडणूक ही कार्यकर्त्यांच्या बळावर जिंकता येते. जामनेरात गेल्या काही वर्षात भाजपचे कार्यकर्ते कमी आणि महाजनांचे हुजरेच वाढत राहिले आहेत. तिथला भाजप ‘केडर बेस’चा ‘लीडर बेस’ झाला आहे. पक्षाचे नगरसेवक आपल्यामुळे निवडून आले आहेत आणि तेच त्यांच्यावर आपले उपकार आहेत. त्यामुळे नगर परिषदेचा कारभार करताना त्यांना विचारण्याची गरज नाही, अशा भूमिकेतून आमदार ही स्थानिक स्वराज्य संस्था चालवित होते, असे भाजपचेच काही नगरसेवक सांगतात. ज्यांनी आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापैकी बहुतेकांना यावेळी महाजनांनी उमेदवारी दिली नाही.

आपण कोणालाही उभे केले तरी तो निवडून येईल, हे सिद्ध करण्यासाठी आमदारांनी नवे उमेदवार दिले होते की काहींना धडा शिकवायचा म्हणून त्यांनी हा धोका पत्करला होता, हे त्यांनाच माहिती. विरोधक एकत्र आहेत हे लक्षात आल्यावर तरी त्यांनी सावध व्हायला हवे होते. निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. संघटनात्मक पातळीवर जिल्हाभरातली ताकत एकवटायला हवी होती. पण तसं काहीही झालं नाही. याचे दोन अर्थ काढले जात आहेत. एक तर आमदार महाजन भ्रमात होते किंवा नगर परिषद विरोधकांकडे सोपवून आपली आमदारकी सुरक्षित करवून घेण्याची ‘व्यवस्था’ त्यांनी निवडणुकीपूर्वीच केली होती. अर्थात, या दोनपैकी एकही शक्यता ते स्वीकारतील असे वाटत नाही. आत्मपरीक्षणाचा विवेक गमावला असेल तर तेही शक्य नाही.

ज्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आता जामनेरकरांनी कौल दिला आहे, त्यांनाही मागच्या निवडणुकीत अशाच मग्रुरीमुळे सत्ता गमवावी लागली होती, हे त्यांनी विसरू नये अशी अपेक्षा आहे. महाजनांच्या भाजपला सत्ता सोपवूनही त्यांनी मतदारांच्या भावनांकडे लक्ष दिलं नाही म्हणून मतदारांनी त्यांना खाली खेचलं आहे, हे महाजनांपेक्षा आता सत्तेवर येत असलेल्या आघाडीच्या नेत्यांनी अधिक लक्षात ठेवायला हवं. आपण पैशांच्या बळावर निवडून आलो, सर्व विरोधकांना एकत्र करण्यात यश मिळवल्याने आपल्याला हा विजय मिळणारच होता, हा आणि असला कोणताही भ्रम त्यांनी बाळगू नये. भाजपच्या नेत्यांना धडा शिकवायचा होता म्हणून विरोधकांकडे जामनेरकरांनी सत्ता सोपविली आहे. याचा अर्थ खूप विश्वासाने मतदारांनी आघाडीला मतदान केलं आहे, असं नाही. तो नसलेला विश्वास आघाडीच्या नेत्यांना पुढच्या पाच वर्षात कमवावा लागणार आहे. त्यासाठी केवळ घोषणांची आतषबाजी उपयोगाची नाही तर त्याला कृतीची जोडही लागणार आहे. तसे घडले नाही तर आजच्या ‘इतिहासा’ची पुनरावृत्ती ठरलेली आहे.