आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळची मदार आंध्र प्रदेश, कर्नाटकमधील कांद्यावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - गेल्या दोन महिन्यांपासून ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा भुसावळच्या बाजारात तब्बल 75 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. स्थानिक किंवा नाशिक जिल्ह्यातून आवक मंदावल्याने आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून येणाºया कांद्यावर सारी भिस्त आहे.

गेल्या वर्षी कमी पावसामुळे कांदा उत्पादन घटले होते. सध्या तर जळगावसह नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड आदी भागातून जळगाव आणि भुसावळ परिसरात कांद्याची होणारी आवक मंदावली आहे.

यामुळे मोठे व्यापारी व ठोक विक्रेत्यांनी आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून कांद्याची आयात सुरू केली. मात्र, आवक कमी आणि मागणी वाढल्याने अडीच ते तीन महिन्यांपूर्वी फक्त 20 रुपये किलोने मिळणारा कांदा आता तब्बल 75 रुपये किलोपर्यंत भिडला आहे. जुलैपासून ते 15 सप्टेंबरपर्यंत कांद्याचे भाव दर किलोमागे तब्बल 55 ते 60 रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे गगनाला भिडलेला कांदा पाहता काही शेतकºयांनी घरगुती वापरासाठी साठवून ठेवलेला कांदाही बाजारात विक्रीसाठी आणला आहे.

दरम्यान, कांद्याचे ठोक भाव पाच ते साडेपाच हजार रुपये क्विंटल आहेत. मात्र, वाहतूक खर्च निघण्यासाठी बाजारात किरकोळ विक्री 60 ते 75 रुपयांनी होते. महिनाभराच्या अंतराने कांद्याचे दर किलोमागे 25 रुपयांनी वाढल्याने थाळीतून कांदा हद्दपार झाला. एवढेच नव्हे तर हॉटेल्स व्यावसायिकांनी कांद्याचा वापर कमी केला.स्थानिक कांदाही मिळेनासा झाला आहे.

थोडक्यात आढावा असा
- भुसावळ शहरात किरकोळ कांदा विक्री करणारे 20 व्यापारी आहेत. मात्र, कांद्याच्या भावात होणाºया वाढीमुळे क्रयशक्ती कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
- गृहिणींचे बजेट कोलमडले. हॉटेल्स व्यावसायिक, खानावळीतील ताटातून कांदा हद्दपार. मुळा, काकडीने घेतली जागा.
- तालुक्यातील साकरी, किन्ही, तळवेल भागात उत्पादित होणारा कांदा रायपूर, कोलकाता, ओडिसा, दिल्लीच्या बाजारपेठेत निर्यात केला जातो.
- आता मात्र स्थानिक कांदा मिळेनासा झाला आहे. नाशिक जिल्ह्यातूनही कांदा उपलब्ध होत नसल्याने आंध्र, कर्नाटकच्या कांद्यावर मदार.
- जिल्ह्याच्या ठिकाणी दररोज 12 ते 16 टन कांदा आयात. यापैकी भुसावळच्या बाजारात येणाºया कांद्याची हातोहात होते विक्री.

नवीन कांद्याची प्रतीक्षा
उन्हाळयातील उत्पादन घटल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. या मुळे व्यापारी आणि ग्राहकांना आता नव्या काद्यांची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. नवा कांदा बाजारात येईल, तेव्हाच भाव कमी होणे शक्य आहे.
शेख फारूक शेख कदीर, होलसेल व्यापारी, वरणगाव