आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Chaudhari Comment On Sanjay Sawakare At Bhusawal

ज्यांना मोठं केलं तेच फितूर झाले; अनिल चौधरींचा संजय सावकारेंना टोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- भुसावळ मतदारसंघात ज्यांना कोणी ओळखायचे नाही, त्यांना आम्ही मोठं केलं आहे. मात्र, आता तेच फितूर झाले आहेत. आम्ही जे झाड लावलेलं आहे, ते जर सावली देण्याच्या लायकीचं नसेल तर त्याचं करायचं काय, हे येणार्‍या काळात चौधरी बंधूंवर निखळ प्रेम करणारे कार्यकर्ते दाखवून देतील, असा टोला अनिल चौधरी यांनी नामोल्लेख टाळून पालकमंत्री संजय सावकारे यांना हाणला आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने रविवारी तेली समाज मंगल कार्यालयात जाहीर सत्कार करण्यात आला. त्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालिकेतील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते हाजी नईम पठाण होते. व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर, नगराध्यक्ष उमेश नेमाडे, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी, बारामतीचे दीपक निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. चौधरी म्हणाले की, राजकारणात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. मात्र, कूटनीतीचे राजकारण काय असते, हे आम्हाला गेल्या दोन वर्षात कळून चुकले आहे. आता खर्‍या अर्थाने जिल्ह्याचे राजकारण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शत्रू बाहेरचा परवडतो. मात्र, घरातील असला तर त्याचा दंश विषारी असतो. भविष्यात राजकीय युद्ध जिंकण्यासाठी बुद्धीने काम करावे लागणार आहे. आम्ही कार्यकर्त्यांसाठी जीव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असतो म्हणून कार्यकर्ते एकनिष्ठ राहतात.

विकासात अडचणी आणल्या गेल्या
शहराच्या विकासात गेल्या दोन वर्षात काही लोकांनी मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. आता मात्र, चौधरी बंधू शहरात असल्यामुळे विकासाचा बॅकलॉग भरून काढू. ज्यांनी आम्हाला राजकारणात मोठं केलं त्यांना कधीच विसरणार नाही. वेळप्रसंगी राजकारण सोडण्यासही मागेपुढे पाहणार नाही, अशी भावना नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी व्यक्त केली.
आगामी विधानसभा निवडणुकीत भुसावळ मतदारसंघातून चौधरी बंधू जो उमेदवार देतील त्याला निवडून आणू, अशी ग्वाही पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी दिली. प्रास्ताविक आनंद ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन ललित मराठे यांनी केले. कार्यक्रमाला पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते.