आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Choudhari News In Marathi, BJP, Divya Marathi, Jalgaon

मोठय़ा भावाला शह देण्यासाठी धाकट्या भावाचे धक्कातंत्र!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल चौधरींनी अद्याप भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलेला नाही. परंतु त्यांनी या पक्षाचा प्रचार करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘साई डेअरी’च्या शेजारी स्वतंत्र प्रचार कार्यालयही शनिवारी सुरू केले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार गिरीश महाजन यांनी या कार्यालयाचे उद्घाटन केले हे विशेष! अर्थात, स्थानिक पातळीवर आता प्रस्थापित भाजपेयींनी चौधरींना कितीही विरोध केला तरी त्यांचा प्रवेश होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी चित्र आहे.


अनिल चौधरींनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला नसला तरी गळ्यात या पक्षाचा रुमाल अन् ‘नमो: नाथ’ ची टोपी घातली आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वडील बंधू संतोष चौधरींसोबत काम करताना जे कार्यकर्ते जुळले होते, त्यांना आता भाजपमध्ये आणण्याचे कृतिशील पाऊलही त्यांनी उचलले आहे. म्हणूनच पहिल्या टप्प्यात त्यांनी अशोक चौधरी, कैलास चौधरी, युवराज पाटील यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. विशेष म्हणजे या तिघांच्या सौभाग्यवती सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. प्रकाश अहिरे, माजी नगरसेवक रामदास सावकारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. वसंतराव झाडखंडे, कैलास महाजन यांच्यासह डझनभर गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास संस्थांचे पदाधिकारी अशा जवळपास 250 जणांनी अधिकृतपणे भाजपत प्रवेश केला आहे. प्रवेश करणारे हे बहुतांश जण हे व्यक्तिगतरीत्या संतोष चौधरींवर प्रेम करणारेही आहेत. तरीही या कार्यकर्त्यांनी अनिल चौधरींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये जाणे पसंत केले आहे. राष्ट्रवादीतील चार नगरसेवकांच्या कुटुंबातील प्रमुख सदस्यांचा अनिल चौधरींनी भाजपमध्ये प्रवेश घडवून आणण्याचा गनिमी कावा म्हणजे राष्ट्रवादीला सुरुंग लावून वडील बंधू संतोष चौधरींना राजकीय सारीपाटावर अनपेक्षितपणे शह देण्याचाच प्रयत्न असल्याचे चित्र या माध्यमातून समोर येऊ पाहात आहे.


लांब राहणार्‍यांना नेता का मानायचे?
राष्ट्रवादीत असताना तब्बल 500 किलोमीटर अंतरावर राहणार्‍या लोकांना नेता मानले. मात्र, विघ्न आल्यावर ते निवारण्यासाठी त्यांची मदतच झाली नाही. मग त्यांना नेता का मानायचे? त्यांच्यापेक्षा 30 किलोमीटर अंतरावरील भाजपचे एकनाथ खडसे, आमदार गिरीश महाजन यांनाच नेता मानलेले बरे. कार्यकर्ते हीच आमची संपत्ती आहे. तिच्या बळावरच विरोधकांना भुईसपाट करू, असे परखड मत राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल चौधरी यांनी यावेळी व्यक्त केले. त्यानतंर आमदार गिरीश महाजन यांनी ईश्वरलाल जैन यांच्यावर आरोप केले.