आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या कुटुंबीयांना जमीन दिली काय? अंजली दमानिया यांनी मागितली माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - येथील एमआयडीसीतील प्लास्टिक पार्क किंवा टेक्स्टाइल पार्ककरिता जमीन देण्यात आली आहे का? ही जमीन खडसे कुटुंबातील व्यक्तींना दिली असल्यास त्याची सुस्पष्ट माहिती देण्यात यावी, अशा आशयाचा अर्ज बुधवारी अंजली दमानिया यांनी भुसावळ तहसील कार्यालयात दिला.

अंजली दमानियांच्या उपोषणामुळे आमदार एकनाथ खडसे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हाेता. त्यानंतर अाता दमानियांकडून खडसेंच्या इतर प्रकरणांची कागदपत्रे जमवण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी दमानिया भुसावळात अाल्या. मात्र, या वेळी तहसीलदार हरीश भामरे हे जळगावी बैठकीला गेले असल्याने त्यांच्याशी भेट झाली नाही. त्यामुळे त्यांनी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना भेटून याबाबत माहिती मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. त्यात नजीकच्या काळात प्लास्टिक पार्क किंवा टेक्स्टाइल पार्ककरिता जमीन देण्यात आली असल्यास त्याविषयीची माहिती देण्यात यावी तसेच एमआयडीसीकरिता मंदाकिनी एकनाथ खडसे, रक्षा निखिल खडसे, शारदा खडसे व खडसे कुटुंबातील इतरांच्या नावे जमीन दिली गेली असल्यास त्याची सुस्पष्ट माहिती द्यावी. यासह ९० ते १०० एकरच्या आसपास एखाद्या व्यक्तीस, व्यक्तींच्या गटास, कुटंुबास अथवा कंपनीच्या नावे जमीन दिली गेली असल्यास आणि भुसावळ एमआयडीसीसाठी दिली गेली असल्यास जमीनधारकांची माहिती देण्यात यावी, असा उल्लेख तहसील कार्यालयात दिलेल्या अर्जात करण्यात आला आहे.

फॉर्च्युनर झाली पंक्चर...
दमानिया या तहसील कार्यालयातून जळगावकडे त्यांच्या फॉर्च्युनर गाडीने रवाना झाल्या. मात्र, भुसावळच्या जळगाव रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ त्यांच्या गाडीचे चाक पंक्चर झाल्याने त्यांना १५ मिनिटे रस्त्यावर उभे राहावे लागले.

कागदपत्रांची जमवाजमव...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर काढायची आहेत. त्यासाठी सध्या कागदपत्रांची जमवाजमव सुरू आहे. कागदपत्रे हाती येत नाहीत तोपर्यंत याबाबत बोलणे सयुक्तिक नाही.
- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या, मुंबई
बातम्या आणखी आहेत...