आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेसने फडकावला पक्षाचा उलटा ध्वज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सुस्तावलेल्या राष्ट्रवादीने मंगळवारी वर्धापन दिनाचा औपचारिक कार्यक्रम आटोपण्याच्या गडबडीत पक्षाचा ध्वज चक्क उलटा फडकावला. उलट्या ध्वजाला सलामी देताना काही जणांना पक्षाचे चिन्ह असलेले ध्वजावरील ‘घड्याळ’ उलटे असल्याचे जाणवले. त्यानंतर ध्वज खाली उतरवण्यात येऊन चूक सावरण्याचा प्रयत्न झाला.
लोकसभेतील लाजिरवाणा पराभव आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे बदनाम झालेल्या जळगाव जिल्हा राष्ट्रवादीबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परवा मुंबईत झालेल्या बैठकीतही प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, आमदार आणि पालकमंत्री यांच्या वागण्याबाबत आक्षेप घेतला होता. तसेच सर्वांचा समाचार घेताना एकत्र येण्याची तंबीदेखील दिली होती. त्यामुळे वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सर्वांना एकत्र येण्याची संधी पक्षाकडे होती. मात्र, पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण करण्याची औपचारिकता पूर्ण करण्यातच पदाधिकार्‍यांनी धन्यता मानली. ध्वजारोहणाचे एकमेव काम पूर्ण करतानाही पदाधिकार्‍यांचा सुस्तपणा स्पष्टपणे जाणवला. शहरात राहणारे सर्वच पदाधिकारी ध्वजारोहणासाठी पक्ष कार्यालयात आले आणि उलट्या ध्वजाला सलामी देऊन गेले.
राष्ट्रवादीच्या घड्याळात वाजले 4.40
हा प्रकार अनावधानाने घडला. ध्वज उलटा लावल्याची चूक लक्षात आल्यानंतर लगेच उतरवून सरळ लावण्यात आला. - वाल्मीक पाटील, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीचा पक्षध्वजही तिरंगी आहे. भगवा, पांढरा आणि हिरवा अशा उतरत्या क्रमात मध्यभागी 10 वाजून 10 मिनिटे दाखवणारे ‘घड्याळ’ हे पक्षाचे चिन्ह टाकण्यात आले आहे. पक्षात नेहमीच या घड्याळाचा आणि त्या वेळेचा उल्लेख होतो. मंगळवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनीच या ध्वजाला सलामी देण्याचे नियोजन होते. त्यानुसार ध्वज फडकला अन् सलामीही देण्यात आली; परंतु ध्वजावरील घड्याळात 10 वाजून 10 मिनिटे नव्हे, तर 4 वाजून 40 मिनिटे असल्याचे दिसत होते. प्रत्यक्षात असलेली पक्षाची अवस्था थेट ध्वजावर उमटल्याने सलामी देणारे पदाधिकारी भानावर आले. ध्वज उलटा फडकल्याचे लक्षात आले व त्यानंतर तातडीने ध्वज खाली उतरवण्यात आला.
यांची होती उपस्थिती
जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष मनोज चौधरी, नीलेश पाटील, वाल्मीक पाटील, रमेश पाटील, विनोद देशमुख, सलीम इनामदार, राजेश पाटील, मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, कल्पना पाटील, कल्पिता पाटील, मीनल पाटील, विलास पाटील, राजेंद्र देसले, भगत बालाणी, प्रदीप भोळे, उज्ज्वल पाटील, बी.आर.शिंपी, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.