आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती कार्यक्रम औपचारिकता नव्हे, तर शिस्तीचा भाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- देशाच्या व समाजाच्या उभारणीत ज्यांचे भरीव कार्य आहे, अशा राष्ट्रपुरुषांच्या व थोर व्यक्तींच्या जयंत्यांचा कार्यक्रम आता शासकीय कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी औपचारिकता ठरली आहे. दोन चार डोक्यांनी एकत्र येणे आणि पुष्पहार घालून निघून जाण्याची वृत्ती बळावल्यामुळे शासनालाच याची दखल घ्यावी लागली आहे. थेट आदेश काढून स्वयंप्रेरणेने उपस्थिती राहील यासाठी उपाययोजना करावी, तसेच हा कार्यालयीन शिस्तीचा भाग समजावा असे सांगण्याची वेळ आली आहे.

सर्वसामान्यांसोबत राष्ट्रपुरुषांनाही फटका
शासनातील सर्वच विभागांमध्ये कामचुकार व सह्याजीरावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांना या शासकीय बाबूंचा प्रचंड अनुभव येत असून लालफितीचा फटका बसतो. याबाबत नेहमीच ओरड सुरू असते. परंतु अशा अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वागणुकीतून देशाच्या जडणघडणीत तसेच समाजाला योग्य दिशा देण्यात महत्त्वाचा वाटा असणार्‍या राष्ट्रपुरुषांना बसू लागला आहे. अशा थोर व्यक्तींच्या जयंतीदिनी आयोजित होणारे कार्यक्रम आटोपण्याच्या मानसिकतेतून केले जात असल्याचे निदर्शनास येते; तसेच एखाद दुसरा अधिकारी व नियोजन करणारे दोन-चार कर्मचारी एकत्र येऊन पुष्पहार घालून निघून जातात. याच वेळी कार्यालयात कर्मचार्‍यांची मोठय़ा गर्दी असते. परंतु ते कार्यक्रमाला दांडी मारत असल्याचे निदर्शनास येते.

शासनाने काढला आदेश
राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या जयंतीदिनी तसेच राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमांना शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचार्‍यांची नगण्य उपस्थिती असते. कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन स्वयंप्रेरणेने उपस्थिती राहील यासाठी योग्य उपाययोजना कराव्या, तसेच उपस्थिती हा कार्यालयीन शिस्तीचा भाग समजावा असे आदेशात स्पष्ट केले आहे.


हजेरी नोंदवण्याची गरज
जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग यासारख्या मोठय़ा कार्यालयांमध्ये बर्‍याचदा कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते, परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रत्यक्षात बोटावर मोजण्याइतकीच डोकी असताता. शाळांमधील शिक्षक मात्र याला काही प्रमाणात अपवाद ठरतात. अशा कार्यक्रमांना उपस्थितीचे प्रमाण वाढवण्यासाठी विभागप्रमुखांनी हजेरी बंधनकारक करणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.