आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापकांशिवाय होणार उत्तरपत्रिका तपासणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - प्राध्यापकांच्या संपातून तोडगा काढत विद्यापीठाने परीक्षा सुरू केल्या आहेत. परीक्षा झाल्या असल्या तरी उत्तरपत्रिका तपासणीला ब्रेक लागू नये म्हणून विद्यापीठाने उत्तरपत्रिकाही प्राध्यापकांशिवाय तपासण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू होणार आहे. याबाबत कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांनी शनिवारी बैठक घेऊन उत्तरपत्रिका तपासणी आणि वेळेत निकाल जाहीर करण्याबाबत नियोजनाचा आढावा घेतला.

ऐन परीक्षा काळात प्राध्यापक गेल्या 67 दिवसांपासून संपावर आहेत. संघटनांच्या आडमुठे धोरणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठाने पर्यायी यंत्रणेचा वापर करत परीक्षा घेण्याला सुरुवात केली आहे. अनेक विभागांच्या परीक्षांचे वेळापत्रकही विद्यापीठाला अद्याप जाहीर करता आले नाही. शिक्षकेतर कर्मचारी, तासिका तत्त्वावर काम करणारे शिक्षक, माध्यमिक शिक्षक, सेवा निवृत्त शिक्षक अशा पर्यायी व्यवस्थेच्या आधारे विद्यापीठाने परीक्षा घेण्याचे काम सुरू केले आहे. शिवाय पगार कपातीच्या भीतीने आतापर्यंत 481 संपकरी प्राध्यापक कामावर आले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने उत्तर पत्रिका तपासणीचे कामही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत कुलगुरूंनी आढावा घेतला.

वेळेत लागतील निकाल
संपाच्या काळात पर्यायी व्यवस्थेमार्फत परीक्षा घेतल्या जात आहेत. सोमवारपासून उत्तरपत्रिकाही तपासल्या जातील; त्यामुळे परीक्षेचे निकालही वेळेतच लागतील. पर्यायी यंत्रणेचे सहकार्यही चांगले आहे. डॉ. सुधीर मेश्राम, कुलगुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ