जळगाव - जवखेडे (जि. अहमदनगर) येथे झालेल्या दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जाती-जमाती, भटके- विमुक्त आणि ओबीसी अन्याय-अत्याचारविरोधी संघर्ष समितीने मोर्चा काढला हाेता. त्यात काही तरुणांनी दगडफेक करत १४ दुकाने, ४ हॉस्पिटल, ४ वाहने फोडली.
प्रचंड घोषणा देत असतानाच मोर्चातील कार्यकर्त्यांनी टॉवर चौकातील खादी भांडारवर दगडफेक करून दहशत माजवण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते थांबलेच नाहीत. धावत-पळत त्यांनी पुढचा रस्ता कापला. रस्त्यात येणा-या काचेच्या दुकानांवर दगडफेक करून त्यांनी संपूर्ण परिसरातच गोंधळ माजवला. ते एकाच रांगेत असलेल्या सलग पाच-सहा दुकानांवर दगड फेकून पळून जात होते. बाहेर काय सुरू आहे, याचा अंदाज नसतानाच दुकानांमध्ये दगडांचा मारा झाला. काचा फुटण्याच्या आवाजाने सर्वच जण प्रचंड घाबरले. मोर्चेक-यांनी जी हॉटेल फोडली त्यातील खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये काचा पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पोलिसांची भूमिका केवळ बघ्याचीच
टॉवर चौकातून गोंधळ माजायला सुरुवात झाली. मोर्चासाठी ३ पोलिस अधिकारी, १० कर्मचारी आणि काही होमगार्ड नियुक्त केले होते. मात्र, मोर्चेक-यांनी दुकाने फोडण्यास सुरुवात केल्यानंतरही पोलिसांनी काहीच केले नाही. टॉवर चौक ते बसस्थानकादरम्यान मोर्चेक-यांनी दहशत माजवली. मात्र, पोलिस फक्त पुढे चालत जात होते. अखेर हा प्रकार गंभीर झाल्यामुळे बसस्थानकाजवळ अतिरिक्त पोलिस बंदोबस्त बोलावण्यात आला. त्यांनी पुढे गोंधळ घालू दिला नाही. तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते. काही दुकानदारांनी पोलिसांना दगडफेकीची बाब निदर्शनास आणून दिली. मात्र, आम्ही मोर्चेक-यांच्या संरक्षणासाठी आहोत दुकानदारांच्या नाही, असे उत्तर देऊन ते निघून गेले.
दोषींवर गुन्हे नोंदवणार
^दगडफेक केल्याचे कळताच पोलिस बंदोबस्त वाढवला होता. जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करु. सीसीटीव्हीची मदत घेऊन उपद्रवींचा शोध घेतला जाणार आहे.
प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक