आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anti Toll Agitation: MNS Failed And Police Succeeded

टोलविरोधी आंदोलन: मनसेचे फसले अन् पोलिसांचे साधले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - टोलविरोधी आंदोलनाची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले होते. शहरात 12 नगरसेवक आणि विधानसभेची तयारी करणार्‍या पक्षाकडून लक्षवेधी आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनानेदेखील जय्यत तयारी केली होती. त्यामुळे बुधवारी मनसे कार्यकर्त्यांना केवळ 20 मिनिटेच रास्ता रोको आंदोलन करता आले. आंदोलनाचा फियास्को होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संतापलेल्या काही कार्यकर्त्यांनी एसटीच्या काचा फोडून त्यात जीव ओतण्याचा प्रय} केला; पण तो प्रय}देखील पोलिसांनी हाणून पाडत आंदोलकांना थेट टांगाटोली करून उचलून नेले.


आंदोलनासाठी बुधवारी सकाळी 9.30 वाजेपासून अजिंठा चौफुलीजवळ मनसे कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली होती. सकाळी 10.55 वाजेपर्यंत 200 कार्यकर्ते चौकात हजर होते. 11 वाजता जिल्हाध्यक्ष ललित कोल्हेसह काही जणांचा गट आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर शासनाच्या तसेच टोल आकारणी विरोधात घोषणा देत सर्व कार्यकर्त्यांनी अजिंठा चौफुलीच्या मध्यभागी ठिय्या मांडला; पण पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तापुढे आंदोलकांना जास्त वेळ तग धरता आला नाही. सकाळी 11.05 वाजता रास्ता रोकोला सुरुवात झाली; पण पूर्ण तयारीने आलेल्या पोलिस यंत्रणेने अवघ्या 20 मिनिटात आंदोलकांना ताब्यात घेतले. काही पदाधिकार्‍यांना पोलिसांनी टांगाटोली करून उचलून नेले. त्यानंतर 11.25 वाजेपर्यंत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. 174 आंदोलकांना एमआयडीसी पोलिस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर कलम 68 प्रमाणे अटक करण्यात येऊन नंतर सुटका करण्यात आली.


चौघांना सकाळी अटक
सकाळी 10.45 वाजता नेहरू चौकात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणार्‍या विनोद शिंदे, पंकज खडके, संदीप महाले आणि गौरव विसपुते या चौघांना शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी ताब्यात घेतले. दुपारी 1 वाजता त्यांची सुटका करण्यात आली. तर 12.30 वाजता कालिंका माता चौकात रास्ता रोको करणार्‍या सुनील सपकाळे, मनोज सोनवणे, भानुदास सपकाळे आणि विकास कोळी यांना शनिपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी ताब्यात घेतले होते.


पर्यायी वाहतूक मार्ग
> नेरीनाक्याकडून अजिंठा चौफुलीकडे जाणारा मुख्य रस्ता एसटी वर्कशॉपजवळ बंद केला होता. या रस्त्यावरची वाहने कोल्हे शाळेकडून कालिंकामाता मंदिराजवळ महामार्गावर सोडली. त्यामुळे चौफुलीवर वाहनांची गर्दी झाली नाही.
> औरंगाबादकडून शहरात येणार्‍या दुचाकी, रिक्षांना अयोध्यानगरमार्गे कालिंकामाता मंदिराजवळून शहरात आणले गेले. त्यामुळे शहरातील प्रवाशांचा खोळंबा झाला नाही.
> अजिंठा चौफुलीहून भुसावळ आणि धुळे या दोन्ही बाजूला जाणार्‍या ट्रक आंदोलन सुरू होताच एका सरळ रेषेत आंदोलनस्थळापासून दोन्ही बाजूस 100 मीटर लांब अंतरावर उभ्या करण्यात आल्या. आंदोलन चिघळले असते तरी दगडफेक करण्यासाठी आंदोलकांना मोठय़ा वाहनांपर्यंत पोहोचणे शक्य झाले नसते.


आंदोलनानंतर फोडली एसटी बसची काच
सकाळी 11.20 वाजता रास्ता रोको आंदोलन संपल्यानंतर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी खेडी गावाजवळील महामार्गावर वडनगरीहून जळगावकडे येणारी एसटी बस (क्र एमएच 14 बीटी 1601)ची काच फोडली. त्यानंतर तत्काळ पोलिस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव स्वत: पोलिस ताफ्यासह पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

पोलिस प्रशासनाची हाताळणी होती उत्कृष्ट
मनसेचे रास्ता रोको आंदोलन चिघळू नये, यासाठी मंगळवारी रात्रीपासून पोलिस यंत्रणेने उत्कृष्ट नियोजन केले होते. रात्रीपासूनच जिल्ह्यातील 10 टोलनाक्यांवर पोलिस बंदोबस्त लावला होता. शहरात गस्त वाढवण्यात आली होती आणि आरपीएफच्या दोन तुकड्या तैनात केल्या होत्या. सकाळी आंदोलनस्थळी उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह शनिपेठ, शहर, एमआयडीसी आणि तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक आपल्या पथकांसह हजर होते.


आंदोलन गुंडाळणे सोपे
शहरात मनसेचे 12 नगरसेवक निवडून आले आहेत. स्वत: राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर रास्ता रोको आंदोलन चिघळेल अशी शक्यता वाटत होती. मात्र, तसे घडले नाही. 150-200 कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यामुळे पोलिसांनाही आंदोलन गुंडाळणे सोपे गेले.


..यांनी केले नेतृत्व
जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या वेळी महानगराध्यक्ष चंदन कोल्हे, सुनील पाटील, कपील लोंढे, अनंत जोशी, संतोष पाटील, मिलिंद सपकाळे, पार्वताबाई भील, नितीन नन्नवरे, संतोष पाटील, कांचन सोनवणे, मंगला चौधरी, महिला वैशाली विसपुते, रवींद्र नेरपगारे, जितेंद्र करोसिया, राहुल देशमुख, अतुल वायकोळे, सुमित कोल्हे, दिलीप सुरवाडे आदी सहभागी झाले होते.