आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्योदयच्या लाभार्थी कुटुंबप्रमुखाचे वय 65 तर मुलाचे 52!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - अंत्योदय योजेनेत लाभार्थी कुटुंबप्रमुख आईचे वय 65 तर मुलाचे वय 52 वर्षे दाखवले आहे. दोघांच्या वयोमानातील फरक फक्त 13 वर्षे असल्याचा धक्कादायक प्रकार येथील डॉ. नि. तु. पाटील यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत चव्हाट्यावर आणला आहे.

शहरात अंत्योदय योजनेच्या याद्यांमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांनी एस. बी. सनांसे यांच्याकडील दुकान क्रमांक 15 च्या अंत्योदय कार्डधारक लाभार्थ्यांचा तपशील माहिती अधिकारांतर्गत मिळवला आहे. सनांसे यांच्या दुकानाला या योजनेचे 60 कुटुंब असून लाभार्थी संख्या 240 आहे. या संदर्भात माहिती अधिकारी तथा पुरवठा तपासणी अधिका-यांकडून त्यांना जी यादी मिळाली आहे, त्यात शिधापत्रिकांचा क्रमांक इंग्रजी मुळाक्षरांच्या क्रमानुसार नसून अंकसंख्येप्रमाणे दिलेले आहेत.
एवढेच नव्हे तर यादीतील अनुक्रमांक नऊच्या कुटुंबप्रमुखाच्या सुनेचे वय 20 तर नातवाचे वय पाच वर्षे नमूद केले आहे. अनुक्रमांक 27 च्या कुटुंबप्रमुखाच्या सुनेचे 25 तर नातवाचे वय आठ वर्षे दर्शवण्यात आले आहे. अंत्योदय योजनेच्या याद्यांमधील हे वय जर खरे मानले तर शहरात बालविवाह सर्रास सुरू असल्याचे सिद्ध होऊ शकते. समजा, जर तसे नसेल तर मात्र, या याद्या गौडबंगाल करून बनावट नावांचा समावेश करून तयार केल्या असाव्यात, अशी शंका घेण्यास पुरेपलर वाव आहे. सनांसे यांनी माहिती अधिकारांतर्गत पुरवठा विभागाला पुरवलेली लाभार्थ्यांची यादी ही योजनेत गौडबंगाल असल्याचे स्पष्ट करणारी आहे.

असा सुरू आहे पाठपुरावा
अंत्योदय योजनेंतर्गत सनांसे यांच्या दुकानाच्या 60 लाभार्थ्यांची यादीसह अन्य माहिती डॉ. पाटील यांनी माहिती अधिकारांतर्गत 10 एप्रिल रोजी मागितली होती. परंतु प्रश्नार्थक म्हणून त्यांचा अर्ज 20 एप्रिल रोजी निकाली काढण्यात आला होता. 1 जून रोजी पुन्हा त्यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, पालकमंत्री संजय सावकारे यांचे लेखी पत्र घेऊन अर्ज केला. त्या अंतर्गत 12 जुलै रोजी प्रथम अपील केले. त्यावर 9 जुलै रोजी सुनावणी होती. मात्र, तहसीलदार कामानिमित्त बाहेर असल्याने 15 जुलै रोजी फेर सुनावणी झाली. यातही त्यांना फक्त लाभार्थ्यांची यादी मिळाली आहे.

कार्डांची नोंदच नाही
तहसील कार्यालयातील आवक, जावक रजिष्टरनुसार स्वस्त धान्य दुकान क्रमांक 15 च्या सर्व अंत्योदय कार्ड विषयीची आवेदन पत्र, कार्ड हस्तांतरीत करण्यात आल्याचे पत्र यांच्या नोंदीची प्रत मिळावी, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र, या संदर्भातील नोंदी कार्यालयात आढळून येत नाहीत, असे उत्तर पुरवठा तपासणी अधिका-यांनी दिले आहे. म्हणून सनांसे यांनी पुरवलेल्या यादीतील लाभार्थ्यांची नावे बनावट असू शकतात.