आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arbhalinga Diagnosed Issue At Jalgaon, Divya Marathi

‘गर्भलिंगनिदान’चा गैरवापर, तातडीने चौकशी करण्याची करण्यात आली मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- गर्भलिंगनिदान तंत्राचा गैरवापर करून गर्भपात करण्याचे प्रकार होत आहेत. रुग्णवाहिकेत अनधिकृतरीत्या गर्भलिंगनिदान होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी दामिनी महिला अन्याय-अत्याचार निवारण समिती, स्त्री-भ्रूणहत्या प्रतिबंधक टास्क फोर्सतर्फे करण्यात आली आहे.

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांना शनिवारी निवेदन देण्यात आले. या वेळी सुशीला पाटील, नीलम वोरा, प्रमिला वानखेडकर, मोहिनी गौंड, नीरू शर्मा, सुरेखा ठाकरे, शारदा पाटील, सुनंदा चौधरी, हेमा हेमाडे, पुष्पाताई गुरव, सुमन मोरे, निर्मला कोळी, रत्ना पाटील, ऊर्मिला बडगुजर आदी उपस्थित होते. निवेदनाचा आशय असा : गर्भलिंगनिदान व गर्भपात रोखण्यासाठी शासनाने पीसीपीएनडीटी कायदा केला आहे. त्यानुसार काही कारवाया करण्यात आल्या आहेत ; परंतु काही महिन्यांपासून ही मोहीम थंडावली आहे.

त्यामुळे अनधिकृतरीत्या स्त्री-भ्रूणहत्येचे प्रकार शहरासह जिल्ह्यात घडत असल्याचा आरोप टास्क फोर्सतर्फे करण्यात आला आहे. संघटनेच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातून लिंगनिदान व गर्भपातासाठी सुरत, जळगाव, मालेगाव जिल्ह्यात पाठविले जाते. जिल्हा प्रशासनाकडे जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रात झालेल्या तपासणीचीच नोंद असते ; परंतु बाहेरील राज्यात व जिल्ह्यात जाऊन गर्भपात करणार्‍यांची कोणतीच नोंद नसल्याने हा गोरखधंदा पुन्हा वाढत चालला आहे. शहरात रुग्णवाहिकेत स्त्री-भ्रूणहत्या केली जात असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तळाशी जाऊन तपास करावा, या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी टास्क फोर्सतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

केंद्रावर लक्ष ठेवावे

  • शहरासह जिल्ह्यातील संशयित सोनोग्राफी केंद्रांवर लक्ष ठेवा.
  • गर्भपात थांबविण्यासाठी स्टिंग ऑपरेशन करा.
  • विशेष समितीच्या कारभाराची तातडीने चौकशी करावी,
  • समितीचे सोशल ऑडिट करून त्यांच्या मासिक कारवाईची माहिती घेण्यात यावी.
  • स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी तातडीने कारवाई करावी.