आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागातील धनुर्विद्या खेळाला लागली घरघर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- धनुर्विद्या हा खेळ मुळात ग्रामीण भागात खेळला जातो. मात्र, या स्पर्धेसाठी लागणारे धनुष्यबाण घेण्यासाठी शाळांकडे पैसे नसल्याने या खेळाला घरघर लागली आहे. जळगाव शहरात केवळ कन्या शाळा आणि विवेकानंद विद्यालय या दोनच शाळांकडे धनुष्यबाण उपलब्ध आहेत. महापालिकेच्या शालेयस्तरावरील स्पर्धेत २० मुले आणि केवळ तीन मुलींनी सहभाग घेतला होता.
असे आहेत फायदे
धनुर्विद्या खेळामुळे सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे एकाग्रता वाढते. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना अभ्यासात होतो. मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे व्यायाम यामुळे होतात. तसेच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवले तर शासकीय नोकरीही मिळते.
काय लागते साहित्य?
धनुर्विद्या खेळासाठी धनुष्य (बो), बाण किंवा तीर (ऍरो) आणि टार्गेट असे तीन प्रकारचे साहित्य लागते. त्यात धनुष्य तीन प्रकारचे असतात. त्यात भारतीय बनावटीचे 7 ते7 हजारांपर्यंत, रिकर्व्ह प्रकाराचे 25 ते 30 हजारांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पर्धक कंपाउंड प्रकाराचे धनुष्य वापरतात. त्यांची किंमत लाख रुपयांपर्यंत असते. तसेच बाणाची किंमत 50 रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत असते तर टार्गेटची किंमत साडेतीन हजारांपर्यंत असते.

धनुर्विद्येचा इतिहास
जिल्ह्यातील धनुर्विद्येचा इतिहास तसा फार जुना नाही. 15 वर्षांपूर्वी चोपडा येथील क्रीडा शिक्षक प्रकाश दलाल यांनी त्याची सुरुवात केली होती. गेल्या सहा वर्षांपासून जळगाव जिल्हा हौशी आर्चरी असोसिएशनचे सचिव अमोल चौधरी या खेळासाठी झटत आहेत. त्यांच्याकडे सध्या १० धनुष्य आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवात केली आहे. आतापर्यंत राज्यस्तरावर अनेक खेळाडू त्यांनी घडवले आहेत. शहरात सध्या विवेकानंद विद्यालयाकडे दोन तर कन्या हायस्कूलकडे एक असे तीनच धनुष्य आहेत.
शासनाची मदत नाही
या खेळासाठी शासनाकडून मदत मिळत नाही. पूर्वी मैदान मिळत होते. मात्र सध्या त्यासाठीही शुल्क भरावे लागते. या खेळाबाबत क्रीडा विभागासह शाळाही उदासीन आहेत. त्यामुळे हा खेळ नामशेष होण्यास वेळ लागणार नाही. अमोल चौधरी, सचिव, जळगाव जिल्हा हौशी आर्चरी असोसिएशन.