आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरएडीआरपी योजना अद्यापही थंडबस्त्यात; पोल बदलण्याची कामे अपेक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- भुसावळ शहरात ‘आरएडीआरपी’ योजनेतून डिसेंबर 2012 मध्ये 25 कोटी 60 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. 40 वर्षे जुने पोल, तारा बदलणे आदी महत्त्वाच्या कामासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणार्‍या या योजनेचे काम थंडबस्त्यात आहे. निधी मिळूनही तारा बदलल्या जात नसल्याने आता ऐन सणासुदीत दररोज तांत्रिक बिघाडांची मालिका कायम आहे.

वीज वितरण कंपनीची शहरातील सर्व यंत्रणा 40 वर्षे जुनी आहे. पोल, तारा, ट्रान्सफॉर्मर, स्वीचगार्ड आदींचा यामध्ये समावेश आहे. या सर्व सयंत्रांचे नूतनीकरण करणे आणि शहरातील नागरिकांना गळती विरहीत वीजपुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने आरएडीआरपी योजनेतून शहराला 25 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार हरिभाऊ जावळे यांनी प्रयत्न केले होते.

वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून या योजनेंतर्गत दोन टप्प्यात आयआर मीटर बसवण्यात आले. मात्र, तरीही गळती कमी झालीच नाही. उलट वीज गळती वाढून शहरातील एक्स्प्रेस-2 फिडरवर भारनियमन सुरू झाले. जीपीआरएस सिस्टिमने खाबांना क्रमांक देऊन त्यांचा डाटा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

खासदारांचे होते प्रयत्न
खासदार हरिभाऊ जावळे यांनी केंद्रीय विद्युत राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे आरएडीआरपी योजनेतून निधी मिळण्याची मागणी केली होती. खासदार जावळे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शहराला 25 कोटींचा निधी मंजूर झाला. या निधीचा योग्य वापर झाल्यास वीज वितरणातील समस्या कमी होतील.

वीज गळती कमी होणार
भुसावळात आरएडीआरपी योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. उर्वरित कामेदेखील क्रमाने पूर्ण होतील. सर्व वीज ग्राहकांकडे आयआर मीटर बसल्यानंतर वीज गळती निश्चितच कमी होईल. लवकरच जुनी यंत्रणा बदलून नवीन यंत्रणा बसवणार आहोत.
-ए. एन. भारंबे, उपकार्यकारी अभियंता, भुसावळ

असा आहे निधी
शहर निधीची रक्कम
चोपडा 7 कोटी 5लाख
भुसावळ 25 कोटी 60 लाख
मलकापूर 9 कोटी 78 लाख
नांदुरा 3 कोटी 2 लाख
यावल 5 कोटी 86 लाख