पाचाेरा : तालुक्यातील सावखेडा बुद्रूक येथे भैरवनाथांच्या यात्रेत नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या शेंदुर्णी (ता.जामनेर) येथील भाविकांच्या मिनीट्रक वाहनाचा स्टेअरिंग राॅड तुटला. त्यामुळे वाहन दोन-तीन पलट्या खाऊन खदाणीत जाऊन पडले. या भीषण अपघातात तीन जण ठार, तर ४० जण जखमी झाले. रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात अांबेवडगाव ते वरखेडी दरम्यान झाला.
रतन शिवलाल बारी (वय ५०), मंगला रतिलाल बारी (वय ३५), कडुबा दामू लाेहार (वय ६५, शेंदुर्णी) हे तिघे अपघातात ठार झाले. सावखेडा बुद्रूक येथे भैरवनाथ महाराजांची पाैष महिन्यातल्या चारही रविवारी यात्रा भरते. रविवारी यात्रा असल्याने शेंदुर्णी (ता.जामनेर) येथील शालिक तुकाराम बारी यांनी नवसाचा कार्यक्रम ठेवला हाेता.
यासाठी बऱ्हाणपूर, जळगाव, साेयगाव, शेंदुर्णी येथील नातेवाईक बारी कुटुंबीयांकडे अाले हाेते. एमएच-१९/एस-५०३० या क्रमांकाच्या मिनी ट्रकने सर्व मंडळी सावखेड्याकडे निघाली असताना सकाळी ९.३० वाजता अांबेवडगाव ते वरखेडीच्या मधाेमध असलेल्या दगडांच्या खदाणीजवळ वाहनाचा स्टेअरिंग राॅड तुटला. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रकने दाेनते तीन पलट्या खाल्ल्या. नंतर ती खदाणीत जाऊन पडली. यात वाहनचालक रतन बारी (रा.शेंदुर्णी) हे जागीच ठार झाले, तर अन्य दाेघांचा जळगाव सामान्य रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
अपघात झाला तेव्हा सर्वांनी बचावासाठी अाकांत केला. तेव्हा रडण्याचा माेठा अावाज येत हाेता. जखमींमध्ये लहान मुलांचा अधिक समावेश अाहे. गंभीर जखमी झालेल्या २५ प्रवाशांवर पाचाेरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने जळगाव येथे हलवण्यात अाले.
जखमींची नावे अशी
वसंत नथ्थू बारी (वय ५५, रा.शेंदुर्णी), कल्याणी सुरेश बारी (वय ११, रा.शेंदुर्णी), धीरज श्रावण बारी (वय १४, रा.जळगाव), सुरेश श्रावण बारी (वय ३०, रा.जळगाव), गायत्री गाेविंद नवे(वय १८, रा.बऱ्हाणपूर), सुरक्षा भागवत बारी (वय १८, रा.शेंदुर्णी), स्वाती दिलीप बारी (वय २५, बऱ्हाणपूर), काेमल सुरेश बारी (वय २०, बऱ्हाणपूर), सरिता सुरेश बारी (वय १२), साेनाली भरत बारी (वय २५, शेंदुर्णी), मंगला शालिकराम बारी (वय ६५), पूजा रतिलाल बारी (वय २२), याेगेश गणेश बारी (वय १०), मंगला शालिग्राम बारी (वय ६५), गाेपाल संजय बारी (वय १२), गणेश भिका बारी (वय १७), भाग्येश देवानंद बारी (वय १५), वैभव गजानन बारी (वय १३, सर्व रा.शेंदुर्णी), वैशाली श्रावण बारी (वय ३४, रा.जळगाव), प्राची दिलीप बारी (वय ३, बऱ्हाणपूर), अमाेल बारी (रा.शेंदुर्णी), अंकिता भागवत बारी (रा.शेंदुर्णी), धाेंडाबाई देविदास राऊत (वय ४१, रा.साेयगाव) हे सर्व जखमी झाले अाहेत.
वरखेडीजवळ कलंडलेला अपघातग्रस्त मिनीट्रक.
घटनास्थळी वाहन बाजूला करून जखमींना उपचारासाठी हलवण्याकरिता अनेक हात सरसावले. दिलीप जैन, इसाब पठाण, हर्षल पाटील, शेख इमाम, नाना चाैधरी, याेगेश सपकाळे, अनिल शिंदे, नाना निकम यांनी खासगी वाहनाने जखमींना रुग्णालयात दाखल केले; परंतु ग्रामीण
रुग्णालयात एकही डाॅक्टर नव्हता. त्यामुळे काहींनी डाॅक्टरांना माेबाइलवर काॅल केला असता, त्यांनी ताे उचलला नाही. त्यामुळे शहरातील खासगी डाॅक्टर डाॅ. प्रवीण माळी, डाॅ. दिनेश साेनार, डाॅ.चारुदत्त खानाेरे, डाॅ.भूषण मगर यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन रुग्णांवर उपचार सुरू केले. नंतर शासकीय रुग्णालयातील डाॅक्टर हजर झाले.
जखमींसाठी काही रुग्णांना हलवले
एकाच वेळी जिल्हा रुग्णालयात जखमींची संख्या वाढल्यामुळे इमर्जन्सी वॉर्डात जागाच शिल्लक राहिली नाही. अखेर पूर्वी दाखल असलेल्या काही रुग्णांना ११, १२ क्रमांकाच्या वॉर्डात हलवण्यात आले.
उपचार सुरू असताना रुग्णांच्या हुंदक्यांनी संपूर्ण परिसर शोकमग्न झाला होता. उपचाराकडे लक्ष देण्यासाठी नातेवाइकांनी चांगलीच गर्दी केली होती. डॉ.रितेश पाटील, शिवसेनेच्या मंगला बारी, अरविंद देशमुख, प्रमोद झंवर यांनी मदतकार्यात सहकार्य केले. दुपारी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन जखमी रुग्ण नातेवाइकांची विचारपूस केली.