जळगाव : अारटीअाे कार्यालयात शुक्रवारी दुपारी १२ वाजता एका मद्यधुंद एजंटने थेट उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्याशी हुज्जत घातली. या प्रकारामुळे संतापलेल्या अारटीअाेंनी नागरिकांकडून अनधिकृतरीत्या विविध कामांसाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या दलालांना थेट आरटीओ कार्यालयाबाहेर हाकलले. तसेच यापुढे कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची वाहनाची प्रवेशद्वारावर तपासणी करून साेडण्यात यावे, असे अादेश दिले.
आरटीओ कार्यालयात शुक्रवारी एक मद्यधुंद एजंट थेट आरटीओंच्या दालनात घुसला. त्याने अारटीअाे जयंत पाटील यांच्याशी वाद घातला. या वेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एजंटला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकत नव्हता. मद्यधुंद अवस्थेत असल्याने पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर दिले नाही. कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी एजंटला कार्यालयाबाहेर हाकलले. या प्रकारामुळे संतापलेल्या पाटील यांनी दुपारी 3 वाजता आरटीओ कार्यालय दलालमुक्त करण्याचा ठाम निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना अादेश देऊन दलालांना कार्यालयाबाहेर हाकलण्याचे आदेश दिले. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी दलालांना कार्यालय परिसराच्या बाहेर हाकलले. त्यानंतर कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले.
किरकाेळ कामासाठीही अव्वाच्या सव्वा पैसे
आरटीओ कार्यालयाचे सर्व काम आता ऑनलाइन झालेले आहे. आरसीबुक परवाना पोस्टाने पाठवण्यात येतो. मात्र, दलाल नागरिकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेतात. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ‘महा ई-सेवा’ केंद्रात केवळ २० रुपये शुल्क लागते. मात्र, दलाल नागरिकांकडून १०० ते २०० रुपये घेतात. कार्यालयात दिवसभर दलाल नागरिकांची गर्दी असते. तसेच वाहनेही अस्ताव्यस्त लावण्यात येत होती. त्यामुळे वाहनांची टेस्ट ड्राइव्ह घेण्यास अडचणी येतात; पण अाता अारटीअाेंनी कठाेर पावले उचलल्याने कार्यालयात नागरिकांची हाेणारी लूट थांबणार अाहे. मात्र, ही स्थिती कायम राहील का? याबाबत शंका व्यक्त केली जात अाहे.
एजंटने मद्यधुंद अवस्थेत घातली हुज्जत
- माझ्या कार्यालयात दुपारी १२ वाजता एक एजंट मद्यधुंद अवस्थेत आला होता. त्याने माझ्याशी काही वेळ हुज्जत घातल्याने मी त्याला कार्यालयाबाहेर हाकलून दिले. कार्यालयात अनधिकृत एजंटचा हस्तक्षेप वाढला होता. ते नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेत होते. तसेच ते त्यांच्यासाेबत येणारे नागरिक कार्यालय परिसरात अस्ताव्यस्त वाहने लावत हाेते. त्यामुळे वाहनांच्या टेस्ट ड्राइव्हला अडचणी येत होत्या. त्यामुळे एजंट दलालांना कार्यालयाबाहेर हाकलण्यात आले आहे. प्रत्येक वाहन तपासूनच कार्यालयात सोडण्यात येईल. जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
अाता कार्यालयात येणारे प्रत्येक वाहन, नागरिकाची तपासणी होणार
आरटीओ कार्यालयात यापुढे येणारे प्रत्येक वाहन नागरिकाची प्रवेशद्वारावर तपासणी केली जाणार अाहे. वाहनचालकाचे कार्यालयात काय काम आहे? याविषयीदेखील चाैकशी केली जाणार अाहे. तसेच कार्यालयात विनाकारण येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही. आरटीओ कार्यालय दलालमुक्त करण्याचा संकल्प अारटीअाेंनी केला अाहे. त्यादृष्टीने आरटीओ यांनी मायक्रो प्लॅनिंग केले आहे.