आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाष्य: हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नाही का ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगावातील नवीनजोशी कॉलनीत मकरसंक्रांतीच्या दिवशी (१५ जानेवारी) पतंग उडवणाऱ्या मनोज रमेश जोशी या तरुणाचा उच्च दाबाचा विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या वीज तारांना स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सारी जोशी कॉलनी हादरली आणि हळहळली. काय करावे हे कुणालाच कळत नव्हते. घटनाच तशी चटका लावणारी होती. या दुर्दैवी घटनेला कोण जबाबदार आहे? कशामुळे आणि कुणाच्या चुकीमुळे ही घटना घडली? ही चर्चा तत्काळ सुरू झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरातील नागरिकांनी लगेच मागील शॉक लागलेल्या काही घटनांचा हवाला देत विद्युत तारा आणि पोल हटवण्याची मागणी केली. त्यांची मागणी रास्तही आहे. मात्र, वीज वितरण कंपनीला त्याचे सोयरसुतक नाही. वीज वितरण कंपनी ही कोणत्या मानसिकतेत काम करते हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. वास्तविक, वीज वितरण कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या जीविताला धोका आहे, हे उघड्या डोळ्यांनी दिसत असताना त्यात कोणतेही बदल स्वीकारण्याची तयारी नसते. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात घराजवळून गेलेल्या वीज तारांना धक्का लागून छतावर चढलेल्या महिलेचा, कधी मुलांचा तर घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर पडलेल्या वीज तारांचा स्पर्श होऊनही अनेकांचे बळी गेले आहेत. वीज वितरण कंपनी ही लोकांच्या जीवनात प्रकाश पसरवणारी आहे की अंधार? असा प्रश्नही अनेकदा पडतो. वीज वितरण कंपनीनेच टाकलेले धोकादायक खांब, तारा हटवायच्या असतील तर परिसरातील नागरिकांनी पैसे भरावे मग आम्ही त्या हटवू, असा अडेल तट्टूपणा जर कंपनी करीत असेल तर ते लोकांच्या जीवाशी खेळणेच म्हणावे लागेल. वीज कंपनीचे हे कृत्य म्हणजे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नाही का? असा प्रश्न कुणी जागृत नागरिकाने विचारला तर त्याला वीज वितरण कंपनीकडे काय उत्तर आहे. शहरात कुठेही नागरी वसाहत होत असेल तर तिला महापालिका प्रशासनाची परवानगी असतेच. अशा वसाहतीतून धोकादायक वीज तारा गेल्या असतील तर त्या हटवण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे. त्यांनी पैसे भरावे आणि कंपनीला त्या तारा हटवायचे आदेश दिले पाहिजे. भरायला पैसे नाही म्हणून आज शहरातील अनेक वसाहतींमध्ये अशा धोकादायक तारा आणि खांब कुणाच्या तरी मृत्यूची प्रतीक्षा करीत आहेत. वीज तारांचा धोका नाही, असे एकही शहर सापडणार नाही, पण पतंग उडवणाऱ्या मनोजच्या घटनेपासून धडा घेत जळगावचा विचार केला तर बदलाचा प्रयत्न झाला पाहिजे. शहरातील ४० टक्के भागातून गेलेल्या वीज तारांचा प्रवाह नागरिकांसाठी धोकादायक आहे. नागरिकांनी स्वत:च्या जीवाची काळजी घेतलीच पाहिजे, हे खरे आहे पण जेथे पावला, पावलावर मृत्यू दिसत असेल तर काळजी कुठे? कुठे? आणि किती घेणार? वारंवारच्या या जीवघेण्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कायद्याची आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी केलीच पाहिजे.