आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खान्देशातील काँग्रेसमुक्तीचा वारू शिरपूरकरांनी राेखला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगरपालिकेत थेट नगराध्यक्ष निवडणूक घेऊन फडणवीस सरकारने घोडेबाजाराला लगाम लावला. काँग्रेस राजवटीतील भ्रष्टाचाराच्या सर्वच रुढी, प्रथा, परंपरा बदलवण्याचा चंग बांधून भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमुक्तीची चळवळ सुरू केली आहे. देशात आणि राज्यात भाजप सत्तेवर असली तरी अजून त्यांचे स्थानिक संस्थांवर वर्चस्व नव्हते. त्यामुळे दिल्लीत नसली तरी गल्लीत काँग्रेसचीच सत्ता कायम होती. भाजपने काँग्रेसला गल्लीतूनही उखडून टाकण्याचा चंग बांधला आहे. यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी स्वत: अनेक प्रचारसभा घेतल्या. नियोजन चांगले झाल्यामुळे राज्यात सर्वाधिक जागा जिंकून आणण्यात त्यांना यश मिळाले. त्यांचे हे यश मात्र काँग्रेसचा पूर्णपणे पराभव करू शकणारे नाही. याउलट चित्रं मात्र, खान्देशात पहायला मिळाले आहे. खान्देश हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्याने काँग्रेसला नेहमीच तारले आहे. या निवडणुकीत मात्र खान्देशही भाजपच्या वाटेवर जात असल्याचे दिसून आले. खान्देशात २०११ मध्ये झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपला केवळ ३९ जागा होत्या. या निवडणुकीत तब्बल दुपटीपेक्षा अधिक म्हणजे ९० जागांवर भाजपने वर्चस्व प्राप्त केले आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही अाठ जागांवर विजय मिळवला. जळगाव जिल्ह्यातील १३ पैकी सहा पालिकांवर भाजप, दोन ठिकाणी शिवसेना आणि तीन ठिकाणी स्थानिक आघाडीला यश मिळाले आहे. जिल्ह्यातून काँग्रेस, राष्ट्रवादीचा जवळपास सफायाच झाला आहे. यासांी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. भुसावळ, फैजपूर आणि सावदा या तिन्ही पालिकांच्या निवडणुकीत त्यांनी विशेष लक्ष घातले होते. भुसावळमध्ये त्यांच्या पक्षाच्या आणि गटाच्या उमेदवारांची माजी आमदार संतोष चौधरी यांच्या आघाडीशी सामना होता. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने खडसेंच्या नेतृत्वाखाली बाजी मारली, हे त्यांच्या राजकीय विरोधकांसह सर्वानाच मान्य करावे लागेल. या निवडणुकीतील यशामुळे राज्यातील भाजप नेत्यांचे ते आपल्याकडे पुन्हा लक्ष वळवून घेऊ शकतात. मंत्री गिरीश महाजन हे जळगाव विधान परिषद निवडणुकीत आधी गुंतले होते. त्यानंतर त्यांनीही पारोळा, अमळनेर, धरणगाव येथील निवडणुकीकडे लक्ष घातले होते. त्यांना पारोळ्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील यांना धक्का देण्यात यश मिळाले आहे. चाळीसगावात ४५ वर्षांपासून देशमुखांच्या ताब्यात असलेली पालिका ताब्यात घेण्यात भाजपला यश मिळाले आहे. अर्थात, यात स्थानिक भाजप आमदार उन्मेष पाटील यांचेही श्रेय मोलाचे आहेच. अमळनेर, रावेर आणि चोपडा या तीन नगरपरिषदांमध्ये स्थानिक आघाडींनी निवडणूक जिंकली आहे. या तिन्ही ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांना जनतेने नाकारले आहे. पाचोरा, यावल आणि धरणगाव येथे मात्र शिवसेनेने बाजी मारली. जळगावातून सुरू झालेली भाजपची ही घोडदौड धुळे जिल्ह्यातील दोंडाईचात आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पालिकेपर्यंत कायम राहिली. दोंडाईचात रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखालील भाजप उमेदवारांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीतून ज्यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या डॉ. हेमंत देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस उमेदवारांचा दारुण पराभव केला. जयकुमार रावल यांचे हे मार्केट कमिटीच्या निवडणुकीनंतरचे स्थानिक पातळीवरील दुसरे मोठे यश मानले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची ही पडझड पुढे शिरपुरात येऊन थांबली. आमदार अमरीशभाई पटेल यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीबेन पटेल या शिरपुरात थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विजयासह काँग्रेसला येथे नगरसेवकांच्या सर्वाधिक जागा जिंकून आपला गड कायम ठेवण्यात यश मिळाले आहे. शिरपूरमध्ये जर काँग्रेसला विजय मिळाला नसता तर राज्यात भाजपचे काँग्रेसमुक्तीचे स्वप्न खान्देशात तरी पूर्ण झाले असते, हे मात्र तेवढेच खरे आहे.
त्र्यंबक कापडे, निवासी संपादक (जळगाव)
बातम्या आणखी आहेत...