आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Avinash Achary By Deepak Patve, Divya Marathi

दिव्य मराठी विशेष: दीपस्तंभ कोसळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सर्वेपि सुखिन: सन्तु’ हा जीवनमंत्र कृतीत उतरविण्यातच ज्यांनी आपल्या जगण्याचं सार्थक मानलं आणि त्यासाठी तत्त्वनिष्ठा, राष्‍ट्रभक्ती, शिस्तप्रियता, चारित्र्य आणि संघटनकौशल्य हीच जीवनशैली बनवली ते डॉ. अविनाश आचार्य उपाख्य दादा, मंगळवारी संध्याकाळी हे जग सोडून गेल्याचं औपचारिकपणे जाहीर करण्यात आलं. खरं तर ते केवळ अविनाश आचार्य नावाच्या मानवी देहाचं अचेतन होणं होतं. खरे दादा आपल्या विविधांगी, विस्तृत आणि वर्धिष्णू कार्यातून कधीच अविनाशी झाले आहेत. ‘प्रभो, मज भेट; परंतु एकाच मूर्तीमाजी दिसू नको’ या ओळी दादांना त्यांच्या वडिलांना अखेरचा निरोप देताना आठवल्या होत्या. आज परिस्थिती काय आहे? सहकारातून संस्कृती जपत या माणसाने उभ्या केलेल्या अनेक संस्था आणि हजारो व्यक्तींमध्ये ते आपल्याला आणि पुढच्या अनेक पिढ्यांना सदैव भेटत राहाणार आहेत. धर्मांध आणि जातीयवादी म्हणून बदनाम केला गेलेला राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ दादांच्या रोमारोमांत भिनलेला होता; पण म्हणून त्यांना जातीयवादी आणि धर्मांध ठरविण्याची हिंमत त्यांच्या शत्रूलाही कधी झाली नाही. हा नैतिक दबदबा त्यांनी त्यांच्या कृतीतून निर्माण केला होता.

आयुष्यातली तब्बल 21 वर्षे ते जिल्हा संघचालक होते. एखादी संघटना आणि तिचा विचार कसा आणि कुठे पसरवता येतो हे या स्वयंसेवकाने या 21 वर्षांत दाखवून दिलं. संघटनेचं नेतृत्व करायला आधी ती समजावी लागते. डॉ. अविनाश आचार्य यांनी संघविचार रक्ताच्या थेंबाथेंबात मुरवला होता. म्हणूनच वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच आपल्या मुस्लिम मित्रांना ‘संघ’ काय आहे हे ते समजावून सांगू शकत होते. याच संघविचारांमुळे 1975 मध्ये आणीबाणीत त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. असे असतानाही त्यांनी एक तर जिल्हा संघचालक म्हणून काम करावे किंवा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून राहावे, असा मुद्दा उपस्थित करीत त्यांच्याच स्वकीयांनी वाद निर्माण केला आणि त्यांना संघचालकपद सोडावे लागले होते. त्याचे शल्य 12 वर्षे त्यांना बोचत होते. एक मात्र झालं की, संघचालक पदाची जबाबदारी कमी झाल्यामुळे त्यांना रचनात्मक कार्याचा वटवृक्ष उभा करता आला. सहकार, अर्थ, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात त्यांनी मैलाचे दगड ठरावेत असे प्रकल्प उभारले आणि ते पुढे नेण्यासाठी गुणी स्वयंसेवकांची फौजही उभारली. उत्तम कामं करू शकतील अशा माणसांचा संग्रह करणे हा या माणसाचा स्थायी भाव होता. त्यामुळेच त्यांनी बीजारोपण केलेल्या अनेक संस्था आजही उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत. अर्थात, अशा माणसांचा संग्रह करताना आणि त्यांच्याकडे कामं सोपविताना त्यांच्या कामात कधीच लुडबूड न करण्याचं पथ्य त्यांनी कसोशीने पाळलं आणि म्हणून ती माणसं आणि संस्थाही स्वावलंबी झाल्या आहेत. या संस्था उभ्या करताना असंख्य हातांनी त्यांना त्यांचे विचार अथवा राजकीय पक्ष आड येऊ न देता हात दिला आहे हेही उल्लेखनीय आहे.

डॉ. अविनाश आचार्य एका विशिष्ट विचारांचे असले तरी जळगाव जिल्ह्यातच काय, सार्‍या उत्तर महाराष्ट्रात त्यांचा आदर करणारी माणसं सर्वच पक्षांमध्ये आहेत. यामुळे त्यांना सहकार भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. संघ परिवार आणि वैद्यकीय सेवा क्षेत्राने आपल्याला समृद्ध केलं, असं दादा म्हणत असत. अत्यंत सचोटीने आणि सेवाभावनेने त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम केलं. त्यामुळेच आज या क्षेत्रात शिरलेल्या अपप्रवृत्ती त्यांना व्यथित करीत होत्या. ती व्यथा ते व्यक्तही करीत असत. अर्थात, सेवाभाव हा आतून यावा लागतो, वरवर असून भागत नाही याची त्यांना जाणीव होती आणि म्हणूनच अंतरीच्या तळात सेवाभाव असलेली गुणी माणसं ते बरोबर शोधू शकले. त्याच माणसांच्या खांद्यावर त्यांनी उभ्या केलेल्या सेवाविश्वाची मदार यापुढेही राहाणार आहे; फक्त त्यांना दिशा दाखवणारा आणि मळभ दाटलं की सकारात्मकतेने ते दूर करणारा दादा नावाचा दीपस्तंभ भौतिकरूपात त्यांच्यासमोर आता नसेल. हे केवळ त्यांचंच नाही, संपूर्ण जळगाव जिल्ह्याचं दु:ख आहे.


जळगाव जिल्हा म्हटला की अभिमानाने घेता येईल, असं हे अलीकडच्या पिढीतलं मोठं नाव होतं. त्या अर्थाने हा माणूस या जिल्ह्याची पत होती. त्यांच्या जाण्याने हा जिल्हा यापुढे सामाजिक दिवाळखोरी अनुभवत राहील, हे सांगणे नको.