जळगाव- दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी राज्यात लवकरच कृत्रिम पाऊस पाडला जाणार अाहे. कृत्रिम पावसासाठी अावश्यक असलेल्या रडार यंत्रणेची उभारणी पूर्ण झाली अाहे. मराठवाडा केंद्रस्थानी ठेवून अाैरंगाबाद हे स्थानक निश्चित करण्यात अाले अाहे. तेथून २५० किलाेमीटरच्या क्षेत्रात पाऊस हाेईल. जळगाव जिल्ह्यालाही त्याचा लाभ हाेणार असून एक - दाेन दिवसात ही यंत्रणा कामाला प्रारंभ करणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अजिंठा विश्रामगृह येथे पत्रकारांशी बाेलतांना दिली.
पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर दाेन महिने उलटूनही संपूर्ण राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. राज्याच्या अनेक भागांत पावसाअभावी परिस्थिती गंभीर आहे. िपण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कृत्रिम पावसाचा प्रयोगही त्याच अनुषंगाने करण्यात येत आहे. ज्या भागात कमी पाऊस पडला आहे अशा ठिकाणी त्यामुळे दिलासा मिळू शकेल. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी २७ काेटी रूपयांचा निधी मंजूर केला अाहे. अाैरंगाबाद येथे रडार यंत्रणा उभारून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार अाहे. रडार यंत्रणेच्या तांत्रीक बाबी पूर्ण हाेताच बाष्पयुक्त ढगांमधून पाऊस पाडला जाईल. अाैरंगाबाद विमानतळावरून ही यंत्रणा कार्य करेल.
कृत्रिम पावसाचा प्रयाेग करणाऱ्या तज्ज्ञांच्या चमूने गरज भासल्यास शेजारच्या नांदेड, लातूर किंवा जळगाव विमानतळाचा पर्यायही हाती ठेवला असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.
रडार यंत्रणा देणार ढगांची माहिती...
पाऊस पाडण्यासाठी बाष्पयुक्त ढगांची गरज असते. रडार यंत्रणा अशा बाष्पयुक्त ढगांची माहिती देईल. ही यंत्रणा अमेरिकेतून अाणण्यात अाली अाहे. रडारच्या माध्यमातून ढगांची उंची, दिशा कळू शकणार अाहे. यासाठी हवामान (मेट्रालाॅजिकल) विभागाचीही मदत घेतली जाईल. अमेरिकेच्या व्हेदर मॉडिफिकेशन या लिमिटेड संस्थेला कृत्रिम पाऊस पाडण्याचे काम देण्यात अाले अाहे. या प्रयोगात हवामानशास्त्र केंद्र, भारतीय प्रौद्योगिकी संस्था (चेन्नई), एमआर सॅट यासारख्या संस्थाही सहभागी अाहेत.
असा हाेईल कृत्रिम पावसाचा प्रयाेग
प्रारंभी एअरक्राप्ट (विमान)च्या माध्यमातून क्लाऊड शेडिंग करण्यात येईल. यामध्ये साेडियम क्लाेराइड, एअराेसुल्स ही रसायने ढगांवर फवारली जातील. या यंत्रणेमार्फत ४०० किलाेमीटरपर्यंत पाऊस पाडण्याची क्षमता अाहे. प्रत्यक्षात मात्र २५० किलाेमिटरपर्यंत प्रभावीपणे पाऊस पाडणे शक्य असल्याचा दावा करण्यात अाला अाहे. यासाठी अाैरंगाबादमध्ये शुक्रवारीच ‘सी बॅड डाॅपलर रडार’ बसविण्यात अाले अाहेत. काही शासकीय विभागांची तांत्रीक मान्यता मिळाल्यानंतर दाेन दिवसात कृत्रीम पाऊस पाडला जाणार अाहे.