आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलाकारांना मिळणार आता हक्काचे व्यासपीठ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्यात राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात. या कार्यक्रमांसाठी लोककलाकार, लोककलापथकांची निवड सूची तयार करण्यात येत आहे. या निवड सूचीत समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या कलावंतांना आवाहन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने लोककलाकार लोककलापथकांनी सहभागी होणे अपेक्षित असून संपूर्ण महाराष्ट्रातून निवड करण्यात येणार आहे. यासाठी ३० जूनपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील कार्यालयात तसेच रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाच्या मुंबईतील कार्यालयात महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन’ या वेबसाइटवरही या अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे. जळगावातील अनेक कलापथकांना यात सहभागी होता येणार आहे.
लोककलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही निवड सांस्कृतिक कार्य संचालक सहसंचालक, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रकल्प संचालक, सहव्यवस्थापकीय सहसंचालक महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांची समिती करणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये संधी
संचालनालयातर्फे राज्यात राज्याबाहेर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये कलावंतांना संधी मिळणार आहे. या मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा, लोककला महोत्सव, शाहिरी महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान सोहळा, जीवनगौरव पुरस्कार सोहळा, दिनविशेष, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन यासारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये कलावंतांना सहभागी होता येणार आहे.
या कलाप्रकारांतून निवड
शाहिरी, भारूड, गोंधळ, कीर्तन, आदिवासी नृत्यकला जसे ढोल, तारपा, सोंगी मुखवटे, बंजारा, बोहाडा, कोरकू, गौंड, ठाकर, गौरी, पावरा, भिल्ल, युद्धकला, कर्तब कवायत, वाघ्या- मुरळी, वासुदेव, तुमडी, डहाका, दंडार, ललीत, गोफ, बहुरुपी, जोगवा, कोळीनृत्य, धनगरी गजनृत्य, स्त्रियांचे खेळ (मंगळागौर) यांचा यात समावेश आहे.
खान्देशी कलावंतांना संधी
यात खान्देशातील कलावंतांनादेखील संधी मिळणार आहे. खान्देशात गोंधळ, आदिवासी नृत्य, वाघ्या-मुरळी, मंगळागौर सारखे अनेक कलाप्रकार मोठ्या प्रमाणात सादर होतात. त्यामुळे खान्देशातील कलावंतांची निवड झाल्यास त्यांना ही आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. पर्यायाने यातून स्थानिक कलेला विशेष वाव मिळणार आहे.
शासनाच्या योजना कलावंतांपर्यंत पोहोचाव्यात
ज्या लोककला लोप पावत चालल्या आहेत, त्यांचे पुनरुज्जीवन व्हावे. तसेच या कलावंतांना आर्थिकही मदत मिळावी, यासाठी हा उपक्रम होतोय. अनेक कलावंतांना त्यांच्यासाठीचे उपक्रम किंवा शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना माहितच नाही हे सुद्धा कलावंतांपर्यंत पोहचेल. लोकपरंपरेचा ऱ्हास होऊ नये टिकून राहावा. या सूचीमुळे लोककलावंतांचे जतन होईल. त्यांनाही नवी उमेद मिळेल. तरी जळगाव केंद्रातील कलावंतांनी यात सहभागी व्हावे.
समीर तडवी, समन्वयक, सांस्कृतिक संचालनालय