आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम बापूवर जळगाव महापालिका मेहेरबान; आश्रमाला दिली जागा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- लैंगिक शोषणप्रकरणी सध्या देशभर गाजत असलेल्या आसारामबापूंचे जळगावातही आश्रम आहे. या आश्रमासाठी पालिकेतर्फे 22 हजार चौरस फुटाचा भूखंड देण्यात आला आहे. या आश्रमात एक ध्यानकेंद्र, गोशाळा, कार्यालय व आयुर्वेदिक औषधी विक्रीचे केंद्र आहे.

योग वेदांत समितीचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ जवरे यांच्या प्रयत्नामुळे संस्थेला 1990 मध्ये हा 99 वर्षांच्या करारावर हा भूखंड मिळाला होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत निवृत्तीनगरात 1990 साली भूखंड मिळाल्यावर या ठिकाणी ध्यान केंद्र करण्यात आले आहे. शेजारीच भाविकांना प्रदक्षिणा घालण्यासाठी वडाचे झाड (वडदादा) आहे. एक महादेवाचे मंदिर आणि पुरुषांसाठी स्वतंत्र छोटे ध्यानमंदिर आहे. याच आवारात गायींच्या गोठय़ासाठी पत्री शेड करण्यात आले आहे. आश्रमाचे कामकाज पाहण्यासाठी एक कार्यालय व त्या लगतच आयुर्वेदिक औषधी विक्रीचे केंद्र आहे.

पालिकेकडून कर आकारणी नाही
पालिकेतर्फे आश्रमाच्या कामासाठी देण्यात आलेल्या या भूखंडापासून पालिकेला कोणतेही कररूपी उत्पन्न मिळत नाही. महाराष्ट्र पालिका अधिनियम 132 नुसार सार्वजनिक पूजाअर्चा किंवा सार्वजनिक धर्मादाय प्रयोजनासाठी भोगवट्यासाठी असलेल्या व वापरण्यात येत असलेल्या इमारती, जमिनी किंवा त्यांच्या भागावर कर लावता येत नसल्याने पालिकेकडून कोणताही कर वसूल केला जात नाही.

काम पाहण्यासाठी पंधरा सदस्यीय समिती
आश्रमाचे काम पाहण्यासाठी 15 सदस्यीय समिती आहे. सद्या समितीचे अध्यक्ष प्रदीप वायकोळे, उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील, सचिव धनंजय दहिवदकर, कोषाध्यक्ष मुकेश कोल्हे, सदस्य मानसिंग राजपूत, वासुभाई गेही, माधवराव म्हस्के, संजय वाघ, प्रमोद नारखेडे, सुरेश धांडे, बालकिशन अग्रवाल, अनिल चौधरी, ज्ञानेश्वर बारी, रामकृष्ण बारी, संजय भावसार यांचा समावेश आहे.

दैनंदिन अन् साप्ताहिक कार्यक्रम
आश्रमात असलेल्या ध्यानधारणा केंद्रात अजूनही काही जण येऊन नामजप करतात. महादेव मंदिरात दररोज सकाळी आरती होते. या व्यतिरिक्त दैनंदिन व्हिडिओ सत्संग, दर रविवारी प्राणायाम, ध्यानधारणा व प्रवचनाचा कार्यक्रम चालतो. गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी वार्षिक सांस्कृतिक उत्सव साजरे केले जातात.