आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वीजसंच बंद असल्याने अॅश वॉटर चाचणी रखडली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील अॅश वॉटर रिकव्हरी प्रकल्पामुळे दररोज साडेबारा कोटी लिटर पाण्याचा पुनर्वापर होणार आहे. मात्र, दीपनगरातील चारही संच बंद असल्याने वेल्हाळे बंडात अॅश वॉटर शिल्लक नाही. त्यामुळे प्रकल्पाची चाचणीदेखील पूर्ण झाली नसल्याने दिरंगाई होत आहे.
दीपनगर केंद्रातून वेल्हाळे अॅश पॉडवर राखवाहिनीद्वारे राखमिश्रित पाणी सोडले जाते. वेल्हाळे अॅश पॉडवर राख वेगळी करून हे पाणी परिसरातील नाले आणि नद्यांमध्ये जाऊन जलप्रदूषणाचे प्रमाण वाढते. यामुळे दीपनगरने अॅश वॉटर रिकव्हरी प्रकल्प राबवावा, म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाने अॅक्शन प्लॅन दिला होता. यानुसार तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प वेल्हाळे येथे साकारण्यात आला. गेल्या महिन्यात या प्रकल्पाची अंतिम चाचणी केली जाणार होती. मात्र, या वेळीदेखील दीपनगर प्रकल्पातील चारही संच बंद होते. अॅश वॉटर नसल्याने ही चाचणी रखडली होती. यानंतर तीन संच कार्यान्वित करण्यात आले. यामुळे वेल्हाळे अॅश पॉडमध्ये राखमिश्रित पाणी जमा होण्यास सुरुवात झाली. यामुळे दीपनगरच्या सिव्हिल प्रकल्प या विभागाने चाचणीचे नियोजन केले. दरम्यान, पुन्हा रविवारपासून (दि. १८) दीपनगर केंद्रातील चारही संच बंद करण्यात आले. यामुळे सध्या अॅश पॉडमध्ये पाणी नसल्याने चाचणीचे काम पुन्हा लांबणीवर पडले आहे. आता दीपनगरातील चारही संच अनिश्चित काळासाठी बंद आहेत. राज्याची वीजमागणी कमी असल्याने हे संच बंद ठेवण्यात आले आहेत. विजेची मागणी वाढल्यानंतर दीपनगरातील वीजनिर्मिती संच कार्यान्वित केले जातील. यानंतरच हा प्रकल्प पुन्हा चाचणीसाठी सज्ज ठेवला जाणार आहे. अॅश वॉटर रिकव्हरी प्रकल्प राबवला गेल्यास दररोज १२ कोटी लिटर पाण्याचा पुनर्वापर होईल.
प्रकल्प होणार हस्तांतरित
^अॅशवॉटर रिकव्हरीची पूर्वप्राथमिक चाचणी पूर्ण झाली. मात्र, अंतिम चाचणी अद्यापही झालेली नाही. आता वेल्हाळे पाॅडमध्ये पाणीच नसल्याने चाचणी करता येणार नाही. संच कार्यान्वित होऊन पाणी जमा झाल्यास आठवडाभरात चाचणी करून हा प्रकल्प हस्तांतरित केला जाईल. पी.पी. देशकर, अभियंता, प्रोजेक्ट विभाग, दीपनगर

३५० अश्वशक्तीचे तीन पंप
अॅशरिकव्हरी वॉटर योजनेतून पाणी ओढून ते दीपनगर केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी ३५० अश्वशक्तीचे तीन पंप बसवण्यात आले आहेत. यात दोन पंप कार्यरत तर एक पंप अतिरिक्त स्वरुपाचा असेल. वेल्हाळे बुस्टरपंप ते दीपनगर प्रकल्पापर्यंत हे पाणी वाहून आणण्यासाठी १४ किमी अंतराची पाइपलाइन टाकली आहे. या पाइपलाइनला ठिकठिकाणी एअर व्हॉल्व्ह ठेवले जाणार आहेत.

परिसरातील जलप्रदूषणावर नियंत्रण
वेल्हाळे अॅश पॉडमधून मोठ्या प्रमाणात राखेचे उत्सर्जन होते. यामुळे वेल्हाळे तलावात राखेचे प्रमाण वाढून मत्स्यव्यवसाय धोक्यात आला आहे. यासह वेल्हाळे अॅश पॉडच्या परिसरातील नाले, नद्या प्रदूषित झाले. वेल्हाळे पॉडमधून थेट भोगावती नदीपर्यंतच्या भागात राखेचे लोट पसरले होते. आता अॅश वॉटर योजनेमुळे राखेचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. पॉडमधून पाणी उचलले जाईल तर राख कोरडी होऊन सहज वाहतूक करता येईल. यामुळे परिसरातील जलप्रदूषणावर नियंत्रण येईल.
बातम्या आणखी आहेत...