आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपान येथे एशियन स्कूल स्टुडंट फोरममध्ये ‘अनुभूती’चा सहभाग, भारतातून अनुभूती स्कूलची निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आशियाखंडातल्या प्रत्येक देशांतील निवडक दोन-दोन विद्यार्थ्यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांमध्येच तीन दिवसांचा परिसंवाद घेण्याचा पायंडा जपानमधील ओसाका येथील हिदका हायस्कूलने सुरू केला आहे. 13 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित एशियन हायस्कूल स्टुडंट फोरम-2014 साठी भारतातील एकमेव अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेंशियल स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांना यात संधी दिली.
हिदका हायस्कूलने यावर्षी आपले शतकी वर्ष पूर्ण केले आहे. या शतकी महोत्सवानिमित्त शाळेने आशिया खंडातील अन्य देशांसह भारतातील प्रत्येकी एका शाळेला संधी दिली. या शाळा निवडण्यापूर्वी त्यांच्या प्रतिनिधींनी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. त्यांच्या निकषांनुसार भारतातील अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रासह कला नेतृत्व क्षेत्रातही नैपूण्य दाखवल्याने त्यांची निवड केली गेली. यात अंशुमा लुंकड आर्यन महाजन हे विद्यार्थी निवडण्यात आले होते. या विद्यार्थ्यांसमवेत शिक्षिका सुशा सतीश यांनी जपान येथे आयोजित एशियन हायस्कूल स्टुडंट््स फोरममध्ये सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांनी मानवता, संस्कृती आणि प्रगती या महत्त्वाच्या विषयांवर आपले सादरीकरण केले. जपानची सुंदरता, स्वच्छता, शीस्तबद्धता, काटेकोरपणे कायदा पाळणारे देशप्रेमी नागरिक, सामाजिक बांधिलकी, सुजाण नागरिकत्त्व, सुजाण पालकत्त्व या सगळ्या गोष्टींचे आकलन करण्याची शिकण्याची संधी मिळाल्याचे अंशुमा आणि आर्यन यांनी या दौ-याबाबत मनाेगत व्यक्त करताना सांगितले. भारतातील विविधता एकता समवेत येथील संस्कृती, उत्सव, गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्री, ईद, मोहरम, नाताळ अन् छटपूजा आदींबाबत या विद्यार्थ्यांनी फोरममध्ये माहिती दिली. अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन प्राचार्य बी. कृष्णकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण तयार केले होते. ओसाका येथील हिदका हायस्कूलने आयोजित केलेल्या एशियन हायस्कूल स्टुडंट फोरम-2014 साठी भारतातील एकमेव अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेंशियल स्कूल जळगावच्या विद्यार्थ्यांसमवेत अन्य 13 देशांमधील सहभागी विद्यार्थी मान्यवर.