आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या आसामींनीही धरला घरचा रस्ता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- आसाममधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्टातून आसाममध्ये जाणा-यांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी औरंगाबाद येथून गुवाहाटी येथे जाणा-या 19 युवकांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात बोलावून त्यांचे मन:परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुपारी 3 वाजेच्या रेल्वेने ते युवक गुवाहाटीकडे रवाना झाले.
आसामी लोकांवर हल्ले होत असल्याची अफवा राज्यभर पसरल्याने राज्यातील विविध भागात नोकरीनिमित्त आलेल्या नागरिकांनी घरचा मार्ग धरला आहे. शुक्रवारी औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक वसाहतीत नोकरीला असलेल्या 19 युवकांनी बसने भुसावळ गाठले. भुसावळ रेल्वेस्थानकावर तिकीट खिडकीजवळ तिकीट काढण्यासाठी उभे असलेल्या जमावास पाहून लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक के.एस.पुजारी यांनी सर्व युवकांना पोलिस ठाण्यात बोलावून चहा पाजला. त्यांना काय अडचण आहे, याबाबत विचारणा केली.
या वेळी पोलिस उपअधीक्षक विवेक पानसरे, पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, सुनील वंजारी, यांनी त्या युवकांशी हितगुज साधले. त्यांना कोणी मारण्याची धमकी दिली का, कोणाच्या मोबाइलवर काही धमकीचे फोन आले का, याची माहिती विचारली. मात्र, युवकांनी आम्हाला घरी जायचे आहे, आमचे कुटुंब आमची वाट पाहत आहे, असे सांगत दुपारी तीन वाजेच्या गाडीचे आरक्षण केले आहे, असे सांगत वातावरण शांत झाल्यावर पुन्हा कामावर येणार असल्याचेही काही युवकांनी पोलिसांना सांगितले. सर्वच युवकांचे नाव, त्यांचा फोन क्रमांक, त्यांचा औरंगाबाद आणि आसाममधील पत्ता लिहून घेतला आहे.