आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावकारेंच्या भाजपप्रवेशाने बदलतील राजकीय गणिते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- राष्ट्रवादीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपकडून त्यांना भुसावळची उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? राष्ट्रवादी स्थानिक की बाहेरच्या उमेदवाराला संधी देते, यावर जय-पराजयाची गणिते अवलंबून असतील.
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्थानिक विरोधक असलेल्या माजी आमदार संतोष चौधरींच्या गटाला जाणीवपूर्वक बळ दिले जाते, या प्रमुख कारणामुळे सावकारेंचे पक्षांतर झाले. तत्पूर्वी, सावकारे समर्थक शहराध्यक्ष युवराज लोणारींची उचलबांगडी आणि चौधरींनी दोन दिवसांपूर्वी कार्यकर्ता मेळावा घेऊन सावकारेंवर तोफ डागली होती. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून निवडणूक न लढण्याचा पवित्रा सावकारे समर्थकांनी घेतला होता.

परिणामी चार दिवसांपासून सावकारेंची घालमेल सुरू होती; मात्र सोमवारी हा बांध फुटला. दुपारी 1 वाजता विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात सावकारेंनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. परिणामी भुसावळ विधानसभा मतदारसंघाची राजकीय स्थिती बदलेल. भाजपकडून सावकारे, तर संतोष चौधरींनी दिलेला राष्ट्रवादीचा उमेदवार, अशी तुल्यबळ लढत होईल. यात शिवसेनेकडून उमेदवारी कोणास मिळते हे औत्सुक्यपूर्ण ठरेल.
का घेतला पक्षांतराचा निर्णय?
दोन वर्षांपासून माजी आमदार चौधरी व पालकमंत्री सावकारेंमध्ये बिनसले आहे. नगराध्यक्ष निवडणुकीत सावकारेंनी भाजप-खाविआ आणि राष्ट्रवादीतील चार नगरसेवकांची मोट बांधली होती. या वेळी चौधरींनी भाजपच्या दोघांना आपल्या तंबूत खेचून पालिकेवर वर्चस्व कायम ठेवले. त्यानंतर गेल्या बुधवारी सावकारे गटाचे राष्ट्रवादीचे युवराज लोणारी यांची शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी झाली होती. तसेच राष्ट्रवादीने सावकारेंची उमेदवारी जाहीर करण्यास दिरंगाई केली.
झाल्टे राष्ट्रवादीचे उमेदवार?
संजय सावकारेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार संतोष चौधरींनी सुचवलेले विजय अवसरमल उमेदवार राहण्याची शक्यता जास्त आहे. शिवसेनेकडून संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी जाहीर होण्याचे संकेत आहेत. ऐनवेळी अ‍ॅड. राजेश झाल्टे राष्ट्रवादीचे उमेदवार होऊ शकतात, अशी राजकीय चर्चा आहे.

युतीचा फॉर्म्युला चर्चेत
काँग्रेस आघाडी सरकारमधील कोणत्याही कॅबिनेट किंवा राज्यमंत्र्याने महायुतीमधील घटक पक्षात प्रवेश केल्यास त्यास तो मतदारसंघ सोडावा, असा युतीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे युती झाली तर भुसावळची जागा भाजपला सुटून सावकारे युतीचे उमेदवार असतील. मात्र, युती तुटल्यास सावकारे फक्त भाजपचे उमेदवार असतील. या भूमिकेतूनच सावकारेंचा पक्षप्रवेश झाल्याचे सूत्रांकडून समजते.