जळगाव- सर्वचराजकीय पक्षांनी या वेळी थेट निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतल्याने खान्देशातील 20 मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला आहे. काही ठिकाणी तिरंगी चौरंगी लढती होणार असून, बाकीचे उमेदवार सेटलमेंटच्या तयारीत असल्याची स्थिती आहे. काही ठिकाणी कुणाला विरोधकांची मते खाण्यासाठी मैदानात उतरवले जात आहे, तर माघार घेण्यासाठी कुणाची मनधरणी करावी लागणार आहे. तसेच उमेदवारी मिळाल्याने काहींनी बंडखोरी केली आहे, तर फिक्स वोट बँकेचे धनी असलेले उमेदवार सेटलमेंटसाठी रिंगणात उतरले आहेत. अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत पडद्याआड आर्थिक घडामोडींचा डाव रंगणार असल्याने सुमारे 40 टक्के उमेदवार माघार घेतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विधान परिषद निवडणुकीच्यावेळी अनेकांनी अर्ज भरले. मात्र, ऐनवेळी सगळ्यांनी माघार घेऊन गुरूमुख जगवानी विजयी झाले. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात मोठ्या अर्थिक उलाढालीचे संकेत आहेत. त्यातच आघाडी आणि महायुती तुटल्याने सर्वच उमेदवार रिंगणात उतरले आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या उमेदवारांशिवाय उमेदवारी मिळालेले बंडखोरही मोठ्या संख्येने रिंगणात उतरले आहेत. तसेच छोट्या पक्षांचे उमेदवारही मैदानात आहेत. जात, धर्म आणि व्यक्तीच्या प्रभावाखाली असलेल्या वोट बँकेचा फायदा करून घेणे विरोधकांची वोट बँक तोडण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील असे उमेदवार उभे करण्याचे प्रकार खान्देशातील मतदारसंघांत झाले आहेत. आघाडी आणि महायुती तुटल्याने उमेदवारांना वेळ मिळाला नाही. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना रिंगणात कोण आहेत? यावरून कोण फायद्याचा, कोण तोट्याचा कोण कोणाची मते खाणार? याचा अभ्यास करण्यासाठी अक्टोंबर बरपर्यंत मुदत मिळणार आहे. माघारीला साडेतीन दिवस मिळणार असल्याने उपयोगी उमेदवारांना रिंगणाबाहेर काढण्याचे काम प्रमुख उमेदवार करू शकणार आहेत. केवळ हौसेखातर रिंगणात उतरलेले शून्य उपद्रवमूल्य असलेले उमेदवार अनामत रक्कम वाचवण्यासाठी माघार घेण्याची शक्यता आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि यापूर्वीचा अनुभव पाहता प्रशासनानेही 40 टक्के उमेदवार माघार घेतील, असा अंदाज वर्तवला आहे.
मतदारसंघ उमेदवार
जळगाव शहर 33
जळगाव ग्रामीण 27
भुसावळ 33
पाचोरा 16
चाळीसगाव 18
चोपडा 17
रावेर 26
मुक्ताईनगर 30
अमळनेर 19
एरंडोल 15
जामनेर 17
नंदुरबार 12
अक्कलकुवा 14
नवापूर 22
शहादा 16