आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमनामुळे भुसावळ शहरातील एटीएम सेवेचा उडाला फज्जा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शहरात दोन टप्प्यात सात तास होणा-या भारनियमानाचा परिणाम शहरातील विविध बँकांच्या एटीएमवर झाला आहे. बँकांनी ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी एटीएमची सोय केली असली तरी भारनियमनामुळे ही सेवा ठप्प झाल्याने ग्राहकांची भटकंती होते.
शहरात युको बँक, स्टेट बँक, आयडीबीआय बँक, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, सिंडीकेट बँक , बँक आॅफ इंडिया, जळगाव पीपल्स बँक, अ‍ॅक्सिस बँक आदींचे एटीएम आहे. एकट्या स्टेट बँकेच्या शाखेतून दररोज सहा कोटी रुपयांची उलाढाल होते. शहरातील सर्वच बँकांच्या एटीएममधून दररोज किमान 15 कोटी रुपयांची उलाढाल होते. बँकेचे बरेच ग्राहक मोठी रक्कम खिशात वागविण्यापेक्षा ऐनवेळी एटीएममधून पैसे काढणे पसंत करतात. किंवा आपत्कालीन परिस्थितीत बँकांतून पैसे काढण्यासाठी नागरिकांना जावे लागते. मात्र, शहरात दोन टप्प्यात सात तासांचे वीज भाारनियमन होते. मोठ्या बँकांनी शहरात एटीएम सुरू करताना सात तासांच्या बॅकअप देणा-या बॅटरीज लावणे गरजेचे होते. मात्र, याकडे बहुतांश ठिकाणी दुर्लक्ष झाले. परिणामी आयडीबीआय बँकेसह अन्य नामांकित बँकांचे एटीएम बंद स्थितीत आढळून येतात. वीज पुरवठा बंद झाल्यावर हे चित्र हमखास दिसते. यासह अन्य वेळी सुद्धा सर्व्हर डाऊन असल्याचे कारण दाखवून एटीएम बंद ठेवली जातात.
ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी बँकिंग व्यवसायातील स्पर्धा सातत्याने वाढत आहे. भुसावळसारख्या वेगाने विकसित होणा-या शहरात सुद्धा ही स्पर्धा दिसते. मात्र, सुविधांच्या नावाने बोंबाबोंब असल्याची ओरड आहे. त्यांनी नोकरदारांच्या या शहराकडे बॅँक अधिका-यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
बॅटरीची मागणी केली - भारनियमानामुळे बॅकअप कमी मिळतो. यामुळे वरिष्ठांकडे नवीन बॅटरी मिळण्याची मागणी केली आहे. बॅटरी बसविण्यात आल्यावर एटीएम 24 तास सुरू ठेवण्यात येईल. ग्राहकांना चांगली सुविधा देण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. - मंगल पाठक, व्यवस्थापक,आयडीबीआय बँक , भुसावळ
अशी होते धावपळ - आयडीबीआय बँकेचे एटीएम बंद असण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे एटीएम बंद असल्यास आणि पैशांची अत्यंत आवश्यकता असल्यास मग शहरातील इतर एटीएमची शोध मोहीम सुरू होते. स्टेट बँकेचे एटीएम सुरू असते, मात्र तेथे खूप गर्दी असते. यामुळे सुरू असेल त्या एटीएममधून पैसे काढले जातात. नियमानुसार तीन वेळा इतर बँकांतून एटीएमद्वारे पैसे काढल्यास 50 रुपयांचा भुर्दंड ग्राहकांवर पडतो. यामुळे एटीएम सुरू होणे गरजेचे आहे.