आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणघातक हल्लाप्रकरण : प्रदीप भदाणेला सक्तमजुरी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - तालुक्यातील खंडलाय खुर्द या गावातील तरुणीची छेड काढल्यानंतर तिच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करणार्‍या तरुणाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. श्रीमती एस.एस. सावंत यांनी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. गुरुवारी दुपारी हा निकाल देण्यात आला.

खंडलाय खुर्द या गावातील तरुणीची गावातील तरुण प्रदीप ऊर्फ पंकज भीमराव भदाणे याने दि.27 नोव्हेंबर 2009 रोजी छेड काढली होती. हा प्रकार पीडित तरुणीने आईला सांगितला होता. यानंतर प्रदीपला पीडित तरुणीची गावासमोर माफी मागावी लागली होती. याचा सूड उगविण्यासाठी दुसर्‍या दिवशी प्रदीपने तरुणीच्या घरात शिरून तिच्यावर तलवारीने हल्ला चढविला होता. या वेळी तरुणीच्या बचावासाठी आलेले तिची आई आणि आजोबा यांनाही मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे न्यायालयात या खटल्याचे कामकाज झाले. पीडित तरुणी, तिची आई, तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी अनिता पाटील, पोलिस अधिकारी शरद कुलकर्णी यांची साक्ष झाली.

सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील श्यामकांत पाटील यांनी बाजू मांडली. न्या. र्शीमती सावंत यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद, पुरावे आणि संदर्भ तपासून प्रदीप ऊर्फ पंकज भदाणे याला पाच वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तर कलम 324 अंतर्गत एक वर्षाची शिक्षा व एक हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिन्याची कैद. कलम 452 अन्वये प्रदीपला दोषी धरून दोन वर्षांची शिक्षा व एक हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयातर्फे ठोठावण्यात आली आहे.