आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attention! ATM Will Empty The Account Information

सावधान! एटीएमची माहिती दिली तर खाते होईल रिकामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- ‘गुड मॉर्निंग सर, आय एम टॉकिंग टू एसबीआय’ सुमधुर स्वरात असा संवाद सुरू करणार्‍या ठगांनी शहरातील एका नागरिकाची फसवणूक केली तर एकाने ठगांचे आमिषाला बळी न पडता त्यांना बगल दिली.

सायबर क्राइम प्रकारातील गुन्ह्याचा हा प्रकार आहे. महिनाभरापासून देशभरासह शहरातील अनेक नागरिकांना असे फोन कॉल्स आले आहेत. एसबीआयचे (स्टेट बँक ऑफ इंडिया) प्रतिनिधी असल्याचे भासवून समोरील व्यक्ती एटीएम कार्ड विषयीची संपूर्ण माहिती विचारून घेते. काही मिनिटातच त्या एटीएम कार्डच्या माध्यमातून खरेदी झाल्याचा एसएमएस येतो. फोन सुरू असतानाच ठग संपूर्ण माहितीच्या आधारे तत्काळ खरेदी करीत असल्याचे हे प्रकार समोर आले आहेत. जळगाव शहरातील पंकज खंगार यांना 12 जानेवारी रोजी असाच फोन आला. खंगार यांनी दिलेल्या माहितीवरून पाच मिनिटाच्या आत त्यांच्या कार्डवरुन 621 रुपयांची खरेदी झाल्याचा एसएमएस त्यांना आला तर 21 जानेवारी रोजी अरुण बाविस्कर यांना आलेला कॉलही अशाच प्रकारचा होता. मात्र बाविस्कर यांनी सजग राहून कोणतीही दाद न देता तो कॉल परतवून लावला.

ग्राहकांना फसविण्याचे ठगांचे नवीन प्रकार

एटीएम कार्ड चोरून पैसे काढण्याची पद्धत आजपर्यंत समोर आली होती. मात्र आता या ठगांनी थेट बँकेचे प्रतिनिधी असल्याचे भासवून संबंधित व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये अडचण असल्याचे सांगतात. सुरुवातीला थोडे घाबरवल्यानंतर नागरिक हळूहळू ठगांना सर्व माहिती देतात. त्याच माहितीच्या आधारे हे ठग काही मिनिटातच हात साफ करण्याचा प्रकार करीत आहेत. अचानकपणे आलेल्या फोनकॉलवर माहिती दिल्याने नुकसान झाल्याच्या लक्षात आल्यानंतर मात्र ज्या क्रमांकावरून ठगाचा फोन आला आहे तो क्रमांक बंद पडलेला असतो. सायबर क्राइममध्ये हा नवीन प्रकार समोर आला आहे.

दोन्ही घटनांच्या तक्रारी अद्याप पोलिसांत नाही

दोन्ही घटनांच्या तक्रारी पोलिसांमध्ये दाखल नाही. खंगारे आणि बाविस्कर यांनी याबाबत आपल्या ओळखीच्या लोकांना माहिती देऊन आपबिती सांगितली. त्यानुसार नागरिकांनी त्यांना ठगापासून बचाव करण्याच्या काही सूचनाही दिल्या आहेत.

एक्सक्ल्युझिव्ह

माझे एसबीआयमध्ये खाते नाही. तरीही मला फोनवरून माहिती विचारली गेली. ज्या व्यक्तींचे एसबीआयमध्ये खाते आहे. त्यांनी अनोळखी व्यक्तींना बॅँक खात्याविषयी माहितीच देऊ नये. माझे नुकसान होण्यातून मी वाचलो आहे. इतरांनीही यातून बोध घ्यावा. अरुण बाविस्कर

केस- 1 : पंकज खंगार (रा.तुकारामवाडी) यांना 12 जानेवारी रोजी फोन आला होता. संबंधिताने खंगार यांच्या एसबीआय अकाउंटची मुदत संपली असल्याचे सांगितले. त्यानंतर हळूहळू आपण ऑनलाइन मुदत वाढवून देण्याचे सांगत, एटीएमचा कोड, बँक अकाउंट नंबर विचारून घेतले. प्रक्रिया खरी असल्याचे भासवण्यासाठी मध्येच दोन वेळा फोन कट करून दोन मॅसेज पाठवले. यात खंगारे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच काम सुरू असल्याचे लिहिले होते. त्यामुळे खंगारे यांनी पुन्हा पुढची माहिती दिली. शेवटी फोन कट झाल्यानंतर खंगारे यांच्या अकाउंटमधून 621 रुपयांची खरेदी झाल्याचा मॅसेज आला. यानंतरही ठगाने खंगारे यांना फोन केला. ‘तुम्हारा काम हो गया है’ म्हणत फोन कट केला. त्यानंतर मात्र तो मोबाइल क्रमांक बंदच आहे.

केस- 2 : अरुण बाविस्कर (स्टेडियम शॉपिंग कॉम्प्लेक्स) बाविस्कर यांना 4 जानेवारी रोजी 9771006772 तर 21 रोजी 8873607100 या क्रमांकाहून पी.के.मिर्शा नावाने कॉल आले. ठगाने त्यांना तुमच्या एसबीआय अकाउंटची व्हॅलिडिटी संपली असल्याचे सांगितले. एटीएमबद्दल माहिती मागितली मात्र बाविस्कर यांनी हा कॉल ठगांचा असल्याचा अंदाज बांधून दोन्ही वेळा फोन डिस्कनेक्ट केल्यामुळे ते बचावले. शिवाय बाविस्कर यांचे एसबीआयमध्ये खातेच नाही.

स्टेट बॅँक ऑफ इंडिया मागत नाही फोनवरून कुठलीही माहिती

एसबीआय आपल्या ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारची वैयक्तिक किंवा खाते संदर्भातील माहिती फोन किंवा ई-मेलद्वारे मागवत नाही. खातेधारकाने स्वत: बँकेत हजर राहून लेखी माहिती देण्याची पद्धत आहे. एसबीआयच्या अधिकृत बेवसाइटवरही या सूचना दिल्या आहेत. र्शीकांत धोंड, महाप्रबंधक, एसबीआय