आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad University Drama Group Win At Nandurbar Jibhau Karandak

औरंगाबादच्या ‘स्वार्थ पारायण’ एकांकिकेस प्रथम पुरस्कार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार: निर्माण ग्रुप व संत गाडगेबाबा शैक्षणिक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे आयोजित जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सादर केलेल्या एकांकिकेने प्रथम पारितोषिक पटकावून छाप सोडली. नाशिकच्या स्पंदन परिवाराने द्वितीय, तर जळगावच्या एकांकिकेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. नाशिकच्या शिवामुष्टी सुवर्णा क्रिएशनने सादर केलेल्या एकांकिकेस सर्वोष्कृष्ट प्रायोगिक एकांकिका म्हणून गौरवण्यात आले.
नंदुरबार येथे जिभाऊ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारोह शनिवारी रात्री झाला. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक लोखंडे, नाट्यदिग्दर्शक शिवदास घोडके, अभिनेत्री नीला गोखले, दिग्दर्शक श्याम रंजनकर, साहित्यिक दीनानाथ मनोहर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संजय अपरांती, संयोजक नागसेन पेंढारकर, शिक्षणाधिकारी डॉ राहुल चौधरी, प्रभाकर भावसार, शाहीर हरिभाऊ पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सादर केलेली ‘स्वार्थ पारायण’ ही एकांकिका अप्रतिम होती. या एकांकिकेस 4 पारितोषिके मिळाली. एकांकिकेचे आणि दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक बाळकृष्ण वानखेडे, उत्कृष्ट संगीत भरत जाधव, हृषीकेश कुलकर्णी यांनी पटकावले. पल्लवी मगर व प्रियंका मोरे यांना स्त्री भूमिकेसाठी विभागून पारितोषिके देण्यात आली. ‘स्वार्थ पारायण’ या एकांकिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ओसामाच्या स्त्री भूमिकेचे प्रथम पारितोषिक ऐश्वर्या डावरे, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनेचे पारितोषिक आसिफ अन्सारी यांना ‘आम्हाला माणसाळू नका’ या एकांकिकेसाठी देण्यात आले. नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, मनोज पटेल, संजय मोहिते आदींनी एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते.
जळगावच्या इंद्रधनुष्य ग्रुपने सादर केलेल्या ‘मुक्काम पोस्ट कळमसरा’ या एकांकिकेने तृतीय पारितोषिक पटकावले. या एकांकिकेतील कलावंत नितीन वाघ याला पुरुष अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळाले. शाळकरी मुलांचा खोडकरपणा या एकांकिकेतून अधोरेखित करण्यात आला होता. ही एकांकिका रसिकांना आनंद देऊन गेली.