आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचारी महिलेस स्त्रियाही पाठीशी घालत नाहीत : मोडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- समाजात एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तर त्या महिलेला समाज स्वीकारण्यास तयार होत नाही. एवढेच नव्हे तर स्त्रियादेखील अशा महिलांना पाठीशी घालत नाहीत. ही आपल्या समाजाची एक शोकांतिका असल्याचे प्रतिपादन स्तंभ लेखिका मोहिनी मोडक यांनी रविवारी येथे केले. शहरातील व.वा. वाचनालयात आशा फाउंडेशन या संस्थेतर्फे रविवारी सायंकाळी वाजता संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘स्त्री अत्याचारास स्त्रीच जबाबदार कशी?’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमास माजी कुलगुरू डॉ. के.बी. पाटील, बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक वसंत म्हस्के, आशा फाउंडेशनचे गिरीश कुळकर्णी उपस्थित होते. या वेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके दिली. मोडक म्हणाले की, महिलांना समाजात आजही दुय्यम स्थान दिले जाते. पालक आपल्या मुलींशी योग्य पद्धतीने संवाद साधत नाहीत. मुलींमध्ये किशोर वयातच शारीरिक बदल घडत असतात. या काळात जर कोणी सहानुभूती दाखवली तर मुली सहज जाळ्यात ओढल्या जातात. त्यामुळे पालकांनी या वयात मुलींशी मित्राप्रमाणे संवाद साधणे गरजेचे असते. एखाद्या स्त्रीवर सार्वजनिक ठिकाणी अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी असलेल्या महिलाही बघ्याचीच भूमिका घेतात. अशा ठिकाणी महिलांनी विरोध दर्शवला तर होणाऱ्या अत्याचारावर नियंत्रण येऊ शकते. बऱ्याच स्त्रियांना स्वातंत्र्य नकोसे असते. त्यामुळे चार भिंतीत राहूनच त्या आपले जीवन घालवण्यात सुख मानतात. अनेक स्त्रियांना त्यांच्याविषयी असलेल्या कायद्यांची माहितीच नसते. त्यामुळे अनेकवेळा झालेले अत्याचार दडपले जातात. मुळात आईने मुलाला आणि मुलीला एक समान शिक्षण द्यायला हवे. स्त्रीची सुरक्षा केवळ तिच्या देहाची नसून आत्मसन्मानाचीही असल्याचे मतही मोडक यांनी या वेळी मांडले.