आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळात 2500 रिक्षांना बसणार मीटर; आदेश प्राप्त होताच कार्यवाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- खाचखळग्याच्या रस्त्यातून प्रवास करणार्‍या भुसावळकरांना आता रिक्षामधील प्रवासासाठी मीटरप्रमाणे पैसे मोजावे लागतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जळगाव शहरानंतरच्या पुढील टप्प्यात भुसावळमधील तब्बल 2500 रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसणार आहेत.

जळगाव शहरात प्रवासी वाहतूक करणार्‍या तीन चाकी रिक्षांना सध्या मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र, रिक्षाचालक संघटनांनी या निर्णयास विरोध केला होता. बंदचे हत्यार उपसल्याने प्रवाशांचे हाल झाले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशासाठी इतर सर्व ठिकाणांप्रमाणे जळगावमध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे. जळगाव शहरातील इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात भुसावळ शहरातील 2500 रिक्षांना हे मीटर बसवण्यात येणार आहेत. दरम्यान, भुसावळ शहर रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे.

दिवस-रात्र प्रवाशांची ये-जा सुरू असते. रेल्वे आणि बसस्थानकापासून जळगाव, वरणगाव, यावल आणि जामनेर रोडच्या शेवटच्या टोकावर जाण्यासाठी रिक्षाशिवाय पर्याय नसतो. विस्तारित वस्त्यांमधून मुख्य बाजारपेठ, दवाखान्यांमध्ये येण्यासाठी मंडळी रिक्षाचा आधार घेतात. या सर्वांना आता मीटरप्रमाणे रिक्षाचालकाला पैसे द्यावे लागतील. मात्र, या निर्णयाला भुसावळ शहरातील रिक्षाचालकांचा जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.

रिक्षाचालक-आरटीओत संघर्षाची चिन्हे
>रिक्षाला इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवण्यात प्रवाशांपेक्षा कंपनीचा फायदा आहे. अवैध प्रवासी वाहतूक बंद केली तरच मीटर बसवल्याचा उपयोग होईल. बसस्थानकाजवळील थांब्यावर दोन तासाआड नंबर लागतो. स्वतंत्र रिक्षा करून जाणारे तुरळक प्रवासी असतात.
-तस्लीमखान, शहराध्यक्ष, रिक्षाचालक संघटना

>शहरातील रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवण्याबाबत ऐकीव माहिती आहे. आदेश मिळताच त्यानुषंगाने कृती होईल. उपप्रादेशिक परिवहन विभागाला यासाठी वाहतूक शाखा आवश्यक सहकार्य करेल.
-सतीश जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, भुसावळ

>भुसावळातील रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे प्रयत्न आहेत. रिक्षा युनियनच्या सर्व पदाधिकार्‍यांशी संवाद साधून न्यायालयाच्या आदेशाची माहिती देण्यात येणार आहे.
- सुभाष वारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव

>मीटरप्रमाणे रिक्षा चालतील एवढा शहराचा विस्तार नाही. सलग तीन, चार किलोमीटरचा प्रवास करतील, असे प्रवासी दररोज मिळत नाहीत. रस्ते प्रचंड खराब असल्याने पेट्रोल आणि घसारा जास्त होतो. कमाई कमी, खर्च जास्त असल्याने मीटर आम्हाला परवडणारच नाहीत.
-राजू फालक, रिक्षाचालक, बाजारपेठ थांबा

बसस्थानकापासूनचे भाडे असे
पंधरा बंगला : रस्त्यावर उतरल्यास 30 रुपये.
नाहाटा कॉलेज : जामनेर रोडवरील नाहाटा चौफुलीकडे 10 रुपये सीटप्रमाणे. तर स्वतंत्र (स्पेशल) गेल्यास 50 रुपये
खडका रोड : 10 रुपये सीटप्रमाणे. स्पेशल 40 रुपये
शांतीनगर : रस्त्यावर उतरल्यास 30, थेट घरापर्यंत 50 रुपये
जळगाव रोड : गणेश कॉलनीत जाण्यासाठी 50 रुपये घेतले जातात
शांतीनगर ते बाजारपेठ : शांतीनगरातून ते मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी 40 रुपये
झेडटीसी : गांधी पुतळ्यापासून झेडटीसी जाण्यासाठी स्पेशल 40, प्रतिप्रवासी 10 रुपये
संतोषीमाता हॉल : सर्वाधिक लग्नसमारंभ, खासगी कार्यक्रम होणार्‍या संतोषी माता हॉलवर जाण्यासाठी बसस्थानकापासून सरासरी 40 रुपये घेतले जातात.