आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात दूरनियंत्रित वीजमीटर्स अन् स्वयंचलित पथदिवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- ‘महावितरण’ने जळगाव शहरात वीज वितरण आणि वसुलीसाठी क्रॉम्प्टन ग्रीव्हज् कंपनीला फ्रँचायझी दिल्यानंतर दोन वर्षांनी त्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहेत. दूरनियंत्रित स्मार्ट ग्रीड विद्युत मीटर्स आणि स्वयंचलित पथदिवे यांचा पथदर्शक प्रयोग शहरात सुरू झाला असून त्याची कक्षा वाढली तर कंपनी जळगावकरांना वादातीत सेवा देऊ शकणार आहे.

विद्युत मीटर्समधील तांत्रिक बिघाडामुळे येणारी चुकीची बिले अथवा मीटरमध्ये केलेल्या बदलातून होणारी वीजचोरी हे दोन्ही प्रकार टाळण्यासाठी कंपनीने झेडआयव्ही या स्पॅनिश कंपनीच्या स्मार्ट ग्रीड मीटरची मदत घेतली आहे. शहरातील केळकर मार्केटमध्ये कंपनीने 200 ग्राहकांकडे हे मीटर्स बसविले आहेत. पाच महिन्यांपूर्वी ही यंत्रणा सुरू करण्यात आली असून बंगलोर येथील क्लाऊड कॉम्पिटिशन सर्व्हिसेस या कंपनीच्या रिमोट सर्व्हरला हे मीटर्स जोडलेले असून तिथे प्रत्येक क्षणाचा वीजवापर आणि रिडींगची नोंद होत आहे. वीजपुरवठय़ात काही बिघाड झाला तरी त्याचीही नोंद त्या क्षणी त्या सर्व्हरवर होते. आणखी काही महिन्यांच्या निरीक्षणानंतर या मीटर्सची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्याचा निर्णय क्रॉम्प्टनने घेतला आहे.

स्वयंचलित पथदिवे
कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौक या टप्प्यात स्वयंचलित पथदिवे सुरू केले आहेत. त्यासाठी दोन सर्किट बसविण्यात आले असून त्याद्वारे सुमारे 50 पथदिवे विशिष्ट वेळी सुरू होतात आणि बंद होतात. रात्री 12 वाजेनंतर त्यांचे होल्टेज कमी करून किमान 33 टक्के वीज वाचविण्याचीही व्यवस्था या सर्किटमध्ये आहे. शिवाय एखाद्या खांबावरचा दिवा बिघडला तर लगेच संबंधित अधिकार्‍यांना एसएमएस जाईल आणि त्यामुळे तातडीने दुरुस्ती केली जाईल. सध्या सर्वसाधरण ट्यूब लाइटच वापरण्यात आले असले तरी एलईडी ट्यूबवरही प्रयोग सुरू आहेत. क्रॉम्प्टन कंपनीनेच ही यंत्रणा विकसित केली आहे. काही महिन्यांच्या अभ्यासानंतर या पद्धतीच्या पथदिव्यांची संख्या वाढविण्याचाही कंपनीचा विचार आहे.