आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Avinash Achary News In Marathi, Jayaprakash Narayan, Peopels Movement

सामाजिक योगदान देणारे अविनाश आचार्यांचे देहावसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - 1975च्या आणीबाणीच्या कालखंडात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात राष्ट्रव्यापी जनआंदोलन उभे राहिले, या आंदोलनातून समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणारे नेतृत्व विकसित झाले आणि ते सक्षमपणे नेतृत्व देत असल्याचे आपण अनुभवतो आहोत. आणीबाणी विरुद्धच्या संघर्षात लोकशाहीचा झेंडा खांद्यावर घेऊन सर्व विचारधारेचे लोक सहभागी झाले होते. उत्तर महाराष्‍ट्रात या लढ्याचे नेतृत्व डॉ.अविनाश आचार्य यांच्याकडे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्याग्रहामुळे त्यांना अटक करण्यात आली आणि 18 महिने डॉ.आचार्यांना तुरुंगवास झाला, ही घटना त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण देणारी ठरली.


डॉ.आचार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालस्वयंसेवक होते. बंगलोरच्या वैद्यकीय महाविद्यालयात संघाची हॉफपॅण्ट घालून मोटारसायकलवर हिंडणारा हा तेजस्वी तरुण सर्वांचे लक्ष वेधून घेत असे, या महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य त्यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईत डॉक्टर पूर्णपात्रे यांच्याकडे प्रॅक्टीस केली त्यानंतर त्यांनी सरळ जळगावच्या नगरपालिकेच्या दवाखान्यात गोरगरिबांची सेवा केली व संपूर्ण समाजाचे ते डॉक्टर झाले. एका बाजूने संघाचे अव्याहत कार्य आणि वैद्यकीय सेवा यासाठी अवघे जीवन त्यांनी समर्पित केले. राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हासंघ चालकत्वाची जबाबदारी डॉ.आचार्यांवर होती. या काळात त्यांचा गावपातळीवर आणि झोपडवस्त्यांवर सुसंवाद होता. जुने जळगाव, शनिपेठ, वाल्मीकनगर परिसरातील प्रत्येक घटकात त्यांचा संपर्क असल्यामुळेच या परिसरात अत्यंत मजबूतअसे संघकार्य उभे राहिले व सक्षम कार्यकर्त्यांची पिढ्यांपिढ्या टीम आजही कार्यरत आहे, त्यामुळे ‘संघ’ केवळ उच्चवर्णीयांचा आहे या कल्पनेला छेद मिळाला व तळागाळातल्या लोकांचा संघ अशी संघाची प्रतिमा तयार करण्यात डॉक्टर आचार्य यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. डॉक्टर आचार्य यांच्या कार्याच्या अनेक छटा आम्ही अनुभवल्या आहे, त्यामुळे प्रामुख्याने समन्वय, निरलसता, निर्मितीक्षमता, त्यामुळेच ते रचनात्मक आंदोलनाचे खरे उपासक ठरतात. महात्मा गांधींच्या अनुयायांनी रचनात्मक आंदोलनाला नवी दिशा दिली आहे. विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, ठक्करबाप्पा इ. अनुयायांनी स्वयंसेवी चळवळीला नवे आयाम देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या कालखंडात राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघातही रचनात्मक उपक्रमांवर विशेष भर देण्यातआला. पं.दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदयाची संकल्पना मांडली, त्यातून नानाजी देशमुख, दत्तोपंत ठेंगडी आदी स्वयंसेवकांनी रचनात्मक कार्यातून अंत्योदयाचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला. असे अनेक स्वयंसेवक नंतरच्या कालखंडात पुढे आले आणि वनवासी आदिवासी क्षेत्रात, ग्रामपातळीवर, झोपडवस्त्यांमध्ये कार्य करू लागले, यामध्ये विशेषत: उत्तर महाराष्ट्रामध्ये डॉक्टर आचार्य यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. आणीबाणीच्या संघर्षानंतर ते अधिक प्रभावीपणे रचनात्मक कार्याकडे वळले आणि सुटकेनंतर लगेचच त्यांनी 1979 मध्ये जळगाव जनता सहकारी बँकेची स्थापना केली आणि सहकार चळवळीला नवे परिमाण प्राप्त करून दिले. आज अवघी सहकार चळवळ लयाला जात असताना जनता बँक अतिशय दिमाखदारपणे उभी आहे. सहकार चळवळीतून सामाजिक कार्याचा वारसा डॉक्टरांनी सुस्थापित केला.


सहकार चळवळीला प्रभावी नेतृत्व दिल्यानंतर त्यांनी ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून विवेकानंद प्रतिष्ठान शालेय उपक्रम, झुणका-भाकर केंद्र, वृद्धार्शम, मूकबधिर विद्यार्थ्यांची शाळा, रक्तपेढी, नेत्रपेढी या सारखे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आणि त्यांना सांभाळणार्‍या सुमारे 500 कार्यकर्त्यांना रचनात्मक आंदोलनाचे धडे मिळाले; हेच कार्यकर्ते आता या चळवळीचे वाहक आहेत आणि डॉक्टरांच्या प्रेरणेतून ते सक्षमपणे कार्य करीत आहेत. अलीकडच्या एनजीओ संस्कृतीच्या कितीतरी पूर्वी स्वयंसेवी चळवळ जळगाव जिल्ह्यात रुजविण्याचे कार्य डॉक्टर आचार्यांनी केले.


डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र आदरयुक्त दरारा होता, त्यामुळे ते खर्‍या अर्थाने लोकनेते होते. त्यामुळे सर्वपक्षीय नेते त्यांना नतमस्तक होत असत. गणेश विसर्जनाच्या काळात झालेल्या दंगलीमुळे बंद पडलेली मिरवणूक पुन्हा सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला, हिंदू-मुसलमान सौहार्द सुस्थापित करण्यासाठी त्यांनी मुसलमान नेतृत्वाशी सुसंवाद साधला, गणेश मंडळांचे प्रबोधन केले आणि अनुशासनावर भर दिला.


मिरवणुकीची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यातून पुढे गणेशोत्सव महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे आजही गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीतपणे सुरू आहे. केवळ गणेशेत्सवच नव्हे तर सर्वच लोकोत्सवांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. लोकोत्सवांची जोपासना करण्यासाठी त्यांनी अथक पर्शिम घेतले. मग तो सार्वजनिक रथोत्सव असो अथवा त्यांनीच सुरू केलेला भुलाबाई महोत्सव असो!


जनता बँकेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील संगीत महोत्सवाचे आयोजन जळगावात केले. पं.जसराज, जाकीर हुसैन, पं.शिवकुमार शर्मा इ. नामवंत कलाकारांना जळगावात सर्वप्रथम त्यांनीच बोलावले. त्याचप्रमाणे ‘जाणता राजा’ सारखे भव्य-दिव्य महानाट्य जळगाव जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाखाली योजण्यात आले. दहा दिवसांच्या या आयोजनात सुमारे दीड लाख लोक सहभागी झाले होते. अशा अनेक लोकोत्सवाचे ते प्रणेते होते. आपल्या समाजावर आईसारखे प्रेम करू या! हे त्यांचे ब्रीद वाक्य. आपल्या अनेक भाषणांमध्ये ते म्हणत असत..
‘‘आम्ही गावाची माणसं आमचा जिल्हा हा ताई-भाऊंचा जिल्हा आमचं कल्चर हेच अँग्रीकल्चर आहे.’’
डॉ.आचार्यांच्या निधनाने रचनात्मक आंदोलनाला दिशा देणारे आणि स्वयंसेवी चळवळीचे पितृछत्र हरपले आहे. त्यांच्या परिसस्पर्शाने धन्य झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांमध्ये माझ्यासारख्या सामान्य- शनिपेठेतल्या वस्तीवर राहणार्‍या कार्यकर्त्याची गणना अग्रणी कार्यकर्त्यांमध्ये होते, ही रचनात्मक आंदोलनाची उपलब्धी मी मानतो. दादा आचार्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!


आचार्य कॉम्प्लेक्स येथून आज निघणार अंत्ययात्रा
समाजावर आईसारखे प्रेम करायला शिकवणारे ज्येष्ठ समाजसेवी, राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, जळगाव जनता बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश आचार्य यांचे मंगळवारी संध्याकाळी 5.30 वाजता वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी डॉ.आरती, जावई न्यूरोसर्जन डॉ.संजीव हुजुरबाजार व नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी दुपारी 3.30 वाजता नेहरू चौकातील आचार्य कॉम्प्लेक्स येथील निवासस्थानावरून निघून जळगाव जनता बँक मुख्यालयात जाऊन तेथून टॉवर चौक, चित्रा चौक, शिवतीर्थ मैदान, स्वातंत्र्य चौक काव्यरत्नावली चौक, महाबळ मार्गे संभाजीनगर, कोल्हे हिल्समार्गे जाऊन विवेकानंद प्रतिष्ठानचे काशिनाथ पलोड विद्यालय येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंत्ययात्रेत सहभागी होणाºया नागरिकांनी आपली वाहने शिवतीर्थ मैदानावर पार्क करावीत.


परिचय : डॉ. अविनाश रामचंद्र आचार्य, सर्व जण आदराने ‘दादा’ या नावाने ओळखतात. 2 नोव्हेंबर 1933मध्ये जळगाव येथे जन्म झाला. शिक्षण जळगाव आणि मुंबईत झाले. कर्नाटकमधील मंगलोर येथे एमबीबीएस ही पदवी घेतल्यानंतर मुंबईत एमडी डीजीओ ही पदव्युत्तर पदवी संपादन केली. पत्नी अनुराधा गृहिणी होत्या. मुलगी आरतीला मात्र वैद्यकीय व्यवसायातच पाठवून त्याही स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून प्रख्यात झाल्या. जावई डॉ.संजय मुकुंद हुजुरबाजार हेही प्रख्यात न्यूरोसर्जन आहेत. वैद्यकीय व्यवसाय करीत असताना गोरगरिबांना मोफत सेवा दिली.


आज कामकाज सुरू राहणार
‘कार्यमग्नता हे जीवन व्हावे’ या डॉ. आचार्य यांच्या इच्छेनुसार त्यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले प्रकल्प, शाळा, बँक यांचे दैनंदिन कामकाज बुधवारीही वेळापत्रकानुसारच सुरू ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे, असे केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे कळविण्यात आले आहे.