आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेद वैद्य तात्या जळूकर यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी जगभर भ्रमंती करणारे आंतरराष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम वैद्य श्रीकर ऊर्फ तात्या जळूकर (वय ८०) यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. नाडी तपासणीतून अचूक निदान आणि रुग्णाला हमखास बरे करण्याची हातोटी लाभलेल्या जळूकर यांनी धन्वंतरी देवतेचे राज्यातील पहिले भव्य मंदिर भुसावळात उभारले होते. आयुर्वेदीय उपचार पद्धतीवरही त्यांनी विपुल लेखन केले.

आयुर्वेदाचा प्रचार-प्रसारासाठी जळूकर यांनी हॉलंड, न्यूझीलंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, रशिया, अमेरिका आणि जर्मनी या देशांमध्ये प्रवास केला. संस्कृत भाषेचे उत्तम जाणकार, इंग्रजीचे फर्डे वक्ते असलेले तात्या तब्बल ६० वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. पुण्यातील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी रुग्णसेवेला आरंभ केला. सोबतच आयुर्वेद संशोधनावर भर दिला.

मोरारजी देसाईंनी घेतले औषध
वैद्य जळूकर यांचे वडील दत्तात्रय जळूकर प्रसिद्ध वैद्य होते. त्यांच्याकडे भारताचे तत्कालीन पंतप्रधान (कै.) मोरारजी देसाई स्वत: उपचार घेण्यासाठी भुसावळात आले होते. वडिलांप्रमाणेच आयुर्वेदासाठी जीवन समर्पित केलेल्या जळूकर यांनी आपल्या शिष्याकडून गुरुदक्षिणेत मिळालेल्या जमिनीवर धन्वंतरी मंदिर उभारले.