आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: प्रशासनाच्या आदेशानुसार 'बेबीबाई'चा बंगला होणार जप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- कुंटणखाना प्रकरणामुळे चर्चेत आलेला बेबीबाई चौधरीचा बंगला अखेर जप्त करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. हे आदेश पोलिस प्रशासनाला मंगळवारी प्राप्त झाले. कायदेशीर तरतूद पूर्ण केल्यानंतर येत्या सात दिवसांत बेबीबाई चौधरीचा बंगला जप्त करण्यात येणार आहे.

शहरापासून जवळ असलेल्या नगाव शिवारात (गट क्र.440/4+5 ) प्लॉट क्रमांक सहामध्ये बेबीबाई उर्फ विठाबाई संतोष चौधरी हिचा बंगला आहे. या बंगल्यात देहविक्रीचा प्रकार सुरू होता. नाशिक येथील एका अल्पवयीन मुलीमुळे हा घृणास्पद प्रकार जानेवारी महिन्याच्या अखेरीस उघडकीस आला होता. त्यासंदर्भात 29 जानेवारीला पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर बेबीबाई चौधरीचा बंगला जप्त करावा, अशी मागणी करण्यात येत होती. त्यासाठी आंदोलनेदेखील झाली. ही मागणी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 व सुधारित अधिसूचना 2012 चे कलम 18 प्रमाणे बंगला जप्तीचा प्रस्ताव (3416/2013) जिल्हा प्रशासनाकडे 14 मार्च रोजी पाठविला होता. या प्रस्तावाची सखोल चौकशी आणि शासकीय सोपस्कार पूर्ण केल्यानंतर हा बंगला तीन वर्षांसाठी जप्त करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. यासंदर्भातील लेखी आदेश पोलिस प्रशासनाला मंगळवारी देण्यात आले.

सात दिवसांत होईल कारवाई
बंगला जप्तीसंदर्भात प्रशासनाने दिलेले पत्र मंगळवारी प्राप्त झाले आहे. संबंधितांना काही वेळ देण्यात येईल. त्यानंतर येत्या सात दिवसांनंतर जप्तीची कारवाई होईल. जप्ती आदेश निघाल्या दिवसापासून तीन वर्षांपर्यंत ही जप्ती कायम असेल.
-चंद्रकांत गवळी, पोलिस उपविभागीय अधिकारी

प्रस्तावात तीन गुन्ह्यांचा उल्लेख
या प्रस्तावात बेबीबाई चौधरीवर यापूर्वी दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांचा उल्लेख आहे. यामध्ये पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यातील गुन्हा (10/2013), देवपूर पोलिस ठाण्यातील 2/1998 व 13/2003 च्या गुन्ह्याचा समावेश आहे. बेबीबाईने या बंगल्याचा दुरुपयोग केल्याने ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

आज कोर्टात कामकाज...
कुंटणखानाप्रकरणी बेबीबाई चौधरी आणि गणेश चौधरीचा जामीन अर्ज 5 जुलै रोजी फेटाळण्यात आला होता. याप्रकरणी इतर संशयितांमधील हॉटेल साईकिशनचे मालक सतीश चौधरी, जितू मोरे व डॉ. पी. पी. पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या बुधवारी न्या. आर. आर. कदम यांच्या समक्ष कामकाज होणार आहे. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी हे काम पाहत आहेत.