आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यांमध्ये खडी टाकून उरकले काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आसोदा रस्त्यावरील मोहन टॉकीजजवळील दीड ते दोन फुटांपर्यंतच्या खड्ड्यांमध्ये केवळ खडी टाकून दुरुस्तीचे सोपस्कार पूर्ण करण्याचा प्रताप सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहनांचे नुकसानही होत आहे.

हद्दवादाचा वाहनधारकांना त्रास
जळगाव-आसोदा रस्त्यावर पावसामुळे मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. मोहन टॉकीजच्या पुढील वळणावर ही स्थिती निर्माण झाली आहे. जैनाबादमधील आसोदा रस्त्यावरील शेवटच्या झोपडीपर्यंत महापालिकेची हद्द, तर त्यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द असल्यामुळे या चौकातील दुरुस्तीसाठी दोन्ही विभागांकडून कायमच टाळाटाळ केली जाते. या मार्गावर नव्याने वसलेल्या बहिणाबाई कॉलनी जवळील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. या ठिकाणी पाणी वाहून जाण्यास जागा न ठेवता, बांधकाम करण्यात आले आहे. तर दुसर्‍या बाजूने झाडे लावून पाणीच रोखण्यात आले आहे. परिणामी थोड्या पावसातदेखील या कॉलनीतील पाणी रस्त्यात जमा होते असल्यामुळे खड्डे खोलवर गेले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून वाहतूक ठप्प होण्याच्या घटनाही अनेकदा घडतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पंधरा दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला खडीचे ढीग करून ठेवले होते. त्यानंतर चार दिवसांपूर्वी या खड्ड्यांमध्ये ती खडी टाकली गेली. रस्ता दुरुस्तीचे कोणतेही निकष या ठिकाणी लावले नाहीत. खडीवर डांबरही टाकले गेले नाही व ती दाबलीही गेली नाही. परिणामी लागलीच ही खडी रस्त्यावर विखुरली असून वाहन गेल्यास खडी अंगावर उडण्यासह वाहने सरकण्याचे प्रमाणही वाढले आहे.

बांधकाम विभाग सुस्तच
असोदा रस्त्यावरून आठ गावांची वाहतूक होते, काही दिवसांपूर्वी महापालिकेने या खड्ड्यात बांधकामाचे जीर्ण साहित्य टाकले; मात्र ते दाबले न गेल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रेल्वे गेटपर्यंतही स्थिती आहे. या खड्ड्यांमधून वाहने गेल्यास खड्ड्यातील खडीचे तुकडे अंगावर उडून नागरिकांना जखमाही होत आहेत. यासह वाहने घसरून अपघातही वाढले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही विभागाने याकडे दुर्लक्षच केल्याची स्थिती आहे.