आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसखेडा..भुसावळ ते धूळखेडा; खड्ड्यांमुळे हाडे खिळखिळी, बळावले श्वसनाचे विकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- स्वातंत्र्यपूर्व काळात भुसखेडा नावाने प्रचलित असलेले गाव ब्रिटिश राजवटीत भुसावळ झाले. रेल्वे आणि आयुध निर्माणीमुळे शहराला देशाच्या नकाशावर स्थान मिळाले. मात्र, अलीकडच्या काही वर्षात शहरातील पायाभूत सुविधांचा डोलारा कोसळला. खड्डेमय रस्ते आणि उडणार्‍या धुळीमुळे भुसावळची वाटचाल आता ‘धूळखेडा’कडे सुरू झाल्याचे उपहासाने बोलले जाते.

काँक्रिट आणि डांबरी रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमध्ये पालिकेने चक्क मुरूम टाकून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता कडक उन्हामुळे रस्त्यांवर टाकलेल्या मुरुमामधून धुराळा (धूळ) उडतो. या मुळे वाहनचालक, पादचारी, व्यावसायिक त्रस्त असून धुळीमुळे अनेकांना श्वसनविकार बळावले आहेत. दम्याचा त्रास असलेल्यांना तर घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. दरम्यान, दोन वर्षांपासून रस्ता दुरुस्ती रखडल्याने पालिकेने आता रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढल्या. मात्र, ही दुरुस्ती कधी होईल? याबाबत अनिश्चितता आहे.

सभेनंतर दिलासा

पालिकेची सर्वसाधारण सभा 24 जुलै रोजी झाली होती. यानंतर दोन महिन्याच्या आत 24 सप्टेंबरपर्यंत दुसरी सभा होणे अपेक्षित होती. मात्र, मुख्याधिक ारी अनिल जगताप यांची बदली झाल्याने या नियोजनाला ब्रेक लागला. 1 ऑक्टोबरनंतर मुहूर्त शक्य असल्याने सध्या सभेची विषयपत्रिका तयार करणे सुरू आहे. या सभेत रस्ते दुरुस्तीवर निर्णय अपेक्षित आहे.

श्वसनविकारांची भीती

जामनेर, यावल, जळगाव, वरणगाव नाका परिसर, स्टेशन रोडकडे जाणार्‍या रस्त्यांवर वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. पावसाळ्यानंतर या रस्त्यावर पसरवलेल्या मुरुमातून वाहनांच्या वेगाने धूळ उडते. ही धूळ वाहनचालक, पादचार्‍यांच्या नाकातोंडात जाते. या मुळे अनेकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. दमा असलेल्यांना प्रचंड त्रास होतो.