आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दूषित पाणीपुरवठा; रणरागिणी संतप्त; आयुक्तांच्या दालनात नागरिकांचा ठिय्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील महादेवपुरा भागात मागील काही दिवसांपासून सातत्याने दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिक, बालकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अधिकार्‍यांना आदेश दिल्यावरही सुधारणा होत नसल्याने प्रभाग क्रमांक 21 च्या नगरसेविका मायादेवी परदेशी व परिसरातील नागरिकांनी महापालिकेत थेट आयुक्तांच्या दालनातील सभागृहात ऐन बैठकीत मोर्चा आणून ठिय्या दिला. त्यामुळे पुन्हा एकदा दूषित पाण्याची चर्चा झाली.

शहरातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कमी होत नसून, दिवसेंदिवस अडचणी वाढत आहेत. त्यात अनेक भागात दूषित, दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. त्याबाबतच्या तक्रारी यापूर्वीही महापालिकेत करण्यात आल्या आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 21 मधील चैनीरोड, गल्ली नंबर 5 व 5, 6 ची बोळ, गल्ली नंबर 6, 7 व माधवपुरा परिसरात दुर्गंधीयुक्त, पिवळसर, फेसयुक्त गढूळ पाण्याचा पुरवठा एक ते दोन महिन्यांपासून होत आहे. या पाण्यामुळे नागरिकांना कावीळ, गॅस्ट्रो आजाराची लागण होत आहे. तक्रारीनंतर या भागाची अधिकारी प्रदीप चव्हाण व फिटर कोळी यांनी पाहणी देखील केली आहे. पाणी रात्री सोडण्यात येत असल्याने रात्री अभियंता डी. सी. देवरे यांनाही तक्रार केली आहे. आयुक्त दौलतखान पठाण यांनी येथील कामाचे आदेश महिनाभरापूर्वी दिले. तरीही अधिकारी त्याची दखल घेत नसल्याने नगरसेविका मायादेवी परदेशी यांनी नागरिकांसह आयुक्तांच्या दालनात निर्णय होत नाही, तोपर्यंत येथून हलणार नसल्याची भूमिका घेत तेथे सर्वांनी ठिय्या आंदोलन केले.

सत्तेतील नगरसेवकांनाही काढावा लागला समस्यांसाठी मोर्चा
मायादेवी परदेशी या राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेविका आहेत. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असून सत्ता आहे. असे असतानाही अधिकारी ऐकत नसल्याचे कारण देत त्यांना आयुक्तांच्या दालनात नागरिकांना घेऊन ठिय्या देण्याची वेळ आली. त्यामुळे पदाधिकार्‍यांचा प्रशासनावर अंकुश नाही काय की नगरसेविका प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही असा प्रश्न उपस्थित होतो.
स्वच्छ पाणीपुरवठा होईपर्यंत टँकरद्वारे पाणी
या भागातील पाणीपुरवठा जोपर्यंत स्वच्छ, शुद्ध होत नाही. तोपर्यंत येथील नागरिकांना महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केल्यावर ती मान्य करून दररोज सकाळी टँकरद्वारे पाणी देण्यात येणार आहे. दरम्यान हा पाणीपुरवठा केव्हापर्यंत आणि कसा होईल याबाबत मात्र माहिती देण्यात आली नाही. दरम्यान मागील काही दिवसांत साक्रीरोडवरील भीमनगर, सुंदरच कॉलनी, दक्षता कॉलनी, लुम्बिनी वन परिसर, साई एकतानगर आदी भागातही दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत भीमनगरातील रहिवाशांनीही आंदोलन केले आहे.
चैनीरोडवरील अतिक्रमण काढले
आयुक्तांच्या दालनात पाणीपुरवठ्यासाठी धडक मोर्चा आणल्यावर येथील अतिक्रमण काढत नसल्याच्या तक्रारीनंतर नंदू बैसाणे यांना तत्काळ साधने उपलब्ध करून येथील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा कोठून होतो. हे शोधण्यास मदत होणार आहे.
प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांचीही तक्रार
शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील सदाशिवनगर, जिल्हा परिषद कॉलनी भागातही नागरिकांना दूषित, गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून होत आहेत. त्याची दखल न घेतल्याने गढूळ पाण्याची बाटली आयुक्तांकडे या वेळी हनुमंत वाडिले आणि नागरिकांनी सादर केली आहे.