आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणाबाई स्मारकाला देणार वाळू; धरणगाव तहसीलदारांनी दर्शवली तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम वाळूअभावी रखडल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध करताच जिल्हा प्रशासनाने स्मारकासाठी तत्काळ वाळू उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनीदेखील वाळू मिळवण्यासाठी धरणगाव तहसीलदारांशी चर्चा केली. वाळू उपलब्ध होणार असल्याने कोणत्याही बहाण्याशिवाय ठेकेदाराला स्मारकाचे काम सुरू करावे लागणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडे जप्त केलेली वाळू पडून आहे. लिलावाने ही वाळू विक्री केली जाते. परंतु स्मारकाचे काम वेळेत होण्यासाठी वाळूचा लिलाव न करता शासकीय दराने सहज वाळू उपलब्ध करून देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे हे काम वेळेत सुरू होऊ शकणार आहे.
बांधकाम विभागाने दिले पत्र
स्मारकासाठी प्रशासनाने वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारे पत्र बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. पत्रासोबत त्यांनी बांभोरी येथे असलेल्या वाळू साठय़ातून ठेकेदाराला वाळू देण्याची विनंती केली. शासकीय दर किंवा लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून स्मारकाला प्राधान्याने वाळू देण्यासंदर्भात कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांनी तहसीलदारांशी चर्चा केली.
प्रशासनाने बदलला पवित्रा
> प्रशासकीय मान्यता, डिझाइन आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही स्मारकाचे काम रखडले.
> काम का रखडले, याबाबत ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले वृत्त.
> वाळू लिलाव झाले नसल्याने स्मारकाचे काम सुरू करता येत नसल्याचा ठेकेदाराचा खुलासा.
> ठेकेदाराच्या खुलाशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानेही पुढे केले तेच कारण.
> जप्त वाळू स्मारकासाठी वापरण्याचा ‘दिव्य मराठी’ने दिला पर्याय.
> वाळूमुळे नव्हे, तर शासकीय विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे काम रखडल्याचे वृत्त प्रसिद्ध.
> कार्यकारी अभियंत्यांचे वाळूसाठी प्रशासनाला पत्र, धरणगाव तहसीलदारांशी संपर्क.
> प्रांताधिकार्‍यांनी लिलावाशिवाय वाळू तत्काळ उपलब्ध करून देण्याची दर्शवली तयारी.
तत्काळ वाळू देणार
स्मारकाचे काम थांबू नये, यासाठी आम्ही लिलाव न करता शासकीय दराने तत्काळ वाळू उपलब्ध करून देऊ शकतो. कारवाईत पकडलेली वाळू उपलब्ध आहे. त्यातून वाळू देण्याची आमची तयारी आहे.
-अभिजित भांडे, उपविभागीय अधिकारी