आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुजन क्रांती मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालय ते शिवतीर्थ मैदान फुलले निळ्या, भगव्या, हिरव्या झेंड्यांनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात बुधवारी बहुजन क्रांती माेर्चा मध्ये विविध जाती, धर्माच्या लाेकांनी एकत्रित सहभाग नाेंदवला. सकाळी ११ वाजेपासून शहरात ग्रामीण भागातील वाहने दाखल हाेत असल्याने पाेलिसांनी प्रमुख रस्ते, जाेड रस्ते वाहतुकीसाठी बंद केले हाेते. शिवतीर्थ मैदानावरून दुपारी वाजता सुरु झालेल्या मोर्चाचा दुपारी वाजून ४० मिनीटांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समारोप झाला. 

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा जयघोष करीत एकच पर्व बहुजन सर्व, उठ बहुजना जागा हो, संघर्षाचा धागा हो... या घोषणांनी माेर्चेकऱ्यांनी जळगावकरांचे लक्ष वेधले. दुपारी १२.४५ वाजेपासून शिवतीर्थ मैदानावरून महिलांच्या नेतृत्वात माेर्चात लाेक सहभागी हाेण्यास प्रारंभ झाला. शिस्तीमध्ये निघालेल्या माेर्चाचे पहिले टाेक स्वातंत्र्य चाैकात पाेहोचले, तेव्हा दुपारी १.३५ वाजता शिवतीर्थ मैदानावरून शेवटचा जत्था माेर्चात सहभागी झाला. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या मागण्यांसाठी अॅट्रॉसिटी कायदा कडक करा, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, सच्चर समितीच्या शिफारसी लागू करा आदी मागण्या असलेले फलक घेऊन सर्व मोर्चेकरी शिवतीर्थ मैदानावर एकवटले होते. तेथूनच नियोजित वेळेत दुपारी वाजता मोर्चाला शिस्तबध्दपणे सुरुवात झाली. 
 
रस्त्याच्या दुतर्फा मोर्चेकरी चालत होते. या वेळी युवक, युवती महिलांची माेठ्याप्रमाणात उपस्थिती होती. एससी, एस.टी, ओबीसी, मुस्लिम समाजाच्या महिला पुरुषांचा सहभाग होता. त्यांच्या हातात निळे, हिरवे आणि भगवे झेंडे दिसत हाेते. गाजरे हॉस्पिटलजवळ मोर्चेकरी दुतर्फा झाले. शिस्तबद्धपणे मोर्चा हळूहळू पुढे जात होता. युवती महिला मोर्चाच्या अग्रभागी होत्या. मात्र, नंतर नेते समोर आल्याने त्या मागे गेल्या. शिवतीर्थ मैदानापासून स्टेडीयम चौक, नवीन बसस्थानकाजवळील महात्मा गांधी उद्यानातून जनसंग्राम संघटना फलक घेतलेले ज्येष्ठ नागरिक मोर्चात सहभागी होऊन अग्रभागी चालत होते. त्याला काही जणांनी अाक्षेप घेतला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक मोर्चात आतील बाजूने चालू लागले.
 
स्वातंत्र्य चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. मोर्चासमोर पोलिसांचा ताफा चालत होता. मोर्चा थांबताच पोलिस आयोजकांकडे जाऊन माहिती घेत होते. पुढे जाण्याच्या सूचना करीत होते. जिल्हाधिकारी कार्यालय ते शिवतीर्थ मैदान असे मोर्चाची दोन टोके होती. दुपारी १.३० वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी दोन्ही बाजूने बॅरिकेड्स लावून चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात अाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोरच्या भिंतींवर बसूनही अनेक मोर्चेकरी झेंडे हातात घेऊन बसले होते.तर काही जण झाडांवर चढून मोर्चा पाहात होते. 
 
ला.ना.शाळेसमोर कारची काच फोडली 
ला.ना. शाळेसमोर एका मोर्चेकऱ्याने लावलेल्या कारची काच फोडल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जळगावात बुधवारी बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी आलेले अाधार श्यामराव काळे यांनी त्यांची कार (क्र. एमएच-०५-एएक्स-८०१२) ला. ना. शाळेजवळ लावली हाेती. माेर्चा संपल्यावर कार घेण्यासाठी ते गेले असता त्यांना पुढची काच दगड मारून फोडल्याचे दिसले. त्यांनी तपास केला असता शाळेच्या एका विद्यार्थ्याने दगड मारल्याचे समजले. याप्रकरणी काळे यांनी शहर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

जादा बंदाेबस्ताने हाल 
माेर्चाजिल्हाधिकारी कार्यालयावर पाेहोचल्यावरदेखील गाेविंदा रिक्षा स्टाॅप, शिवतीर्थ मैदान, गाेलाणी मार्केट, चित्रा चाैक, नवीपेठ, स्वातंत्र्य चाैक, बसस्थानक परिसरातील सर्व जाेड रस्ते बंद ठेवण्यात अाले हाेते. दुपारी ३.३० वाजेपर्यंत रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात अाल्याने वाहतुकीची काेंडी अधिक झाली. प्रमुख रस्ते साेडून जाेड रस्त्यांवर बंदी घालण्यात अाल्याने अनेकांनी पाेलिसांशी हुज्जत घातली. 

या दिल्या घाेषणा 
‘एकचपर्व ,बहुजन सर्व’, अॅट्रॉसिटी कायदा कडक करा, ओबीसी जातीनिहाय जनगणना करा, एससी, एस.टी.,ओबीसी आम्ही सर्व मूलनिवासी, संविधानाची अंमलबजावणी करा, सच्चर समितीच्या शिफारसी लागू करा, कोपर्डीप्रकरणी दोषींना फाशी द्या, आये है हम लाखो में, संविधान के सम्मान में , शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करा, उठ बहुजना जागा हो, संघर्षाचा धागा हो.., महिलांवरील अत्याचार थांबवा आदी घोषणा लिहिलेले फलक घेऊन महिला, युवक युवती मोर्चात सहभागी झाल्या होत्या. 

या संघटनांचा हाेता सहभाग 
धनगरसमाज, भोई समाज, कंजार भाट समाज, कोष्टी समाज, नाभिक समाज, चर्मकार समाज, भिल्ल समाज, मातंग समाज, सुवर्णकार सेना, पिंजारी समाज, जमाते इस्लामी हिंद, बंजारा टायगर्स, वाल्मीक लव्य संघटना, अखिल भारतीय बौद्ध महासभा, मुस्लिम पिंजारी समाज बिरादरी, जनसंग्राम संघटना, डेब्युजी फोर्स आदी संघटना माेर्चात सहभागी झाल्या होत्या. 

वेळेवर माेर्चाला प्रारंभ 
नियाेजन समितीने दुपारी १२ वाजता भाषणे अाणि वाजता माेर्चाला प्रारंभ करण्याची वेळी दिली हाेती. अायाेजक मुकुंद सपकाळे, शिवचरण ढंढाेरे, विवेक ठाकरे, मुफ्ती हारूण नदवी, करीम सालार, राजू माेरे, भानुदास विसावे, अशफाक पिंजारी, जहागीर खान, राजेश साेनवणे, चंद्रकांत साेनवणे, दिलीप सपकाळे यांच्यासह विविध समाज, जाती, संघटनांच्या प्रतिनिधींनी शिवतीर्थ मैदानावर माेर्चाला संबाेधित केले. दुपारी १२.४५ वाजता माेर्चाला प्रारंभ झाला. दुपारी वाजता माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पाेहोचला. लांबवरून येणारे अनेक जण उशिरापर्यंत माेर्चात सहभागी झाले.