जळगाव - मी जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला असून तेथे तुम्हाला नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवत एका भामट्याने महिलेचे मंगळसूत्र आणि
मोबाइल लुबाडून नेला. हा प्रकार सोमवारी सकाळी रेन्बो माँटेसरी स्कूलमध्ये घडला.
शिरसोली रस्त्यावरील रेन्बो माँटेसरी स्कूलमध्ये सोमवारी सकाळी एक व्यक्ती आली. त्याने स्कूलच्या संचालक नम्रता शर्मा यांना स्वत:चे नाव सचिन पाटील असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला असल्याचे सांगितले. त्यानंतर शर्मा यांना अंगणवाडीच्या सेविकांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात विचारणा करत प्रत्येक सेविकेच्या प्रशिक्षणासाठी किती पैसे घ्याल, असे विचारले. त्या वेळी शर्मा यांनी भामट्याकडे त्याचे ओळखपत्र मागितले. तेव्हा त्याने चुकीचा मोबाइल नंबर देऊन साहेबांना विचारून येतो, असे सांगून तो तेथून निघून गेला. काही वेळा नंतर तो एका महिलेसह स्कूलमध्ये आला. त्या वेळी शर्मा यांनी त्याला विचार करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागितला. त्यामुळे ते दोघे तेथून निघून गेले. थोड्या वेळानंतर भामट्यांसोबत गेलेली महिला रडत रेन्बो स्कूलमध्ये आली. तिने शर्मा यांना सदर व्यक्तीने मला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून माझे मंगळसूत्र मोबाइल घेऊन पळून गेल्याचे सांगितले. याप्रकरणी शर्मा मंगळवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार देणार आहे.